मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत, असा गंभीर आरोप करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज खळबळ उडवून दिली. मात्र, आता नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर देत, मी उद्या सकाळी अंडरवर्ल्डशी असलेल्या संबंधांबाबतचा हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे म्हहटले. तसेच, त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. सलीम पटेल आणि सरदार वली खान यांच्याशी झालेल्या व्यवहाराची माहितीही त्यांनी दिली. त्यानंतर, मुंबई भाजपचे प्रमुख अॅड. आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी कबुली जबाब दिल्याचं म्हटलं आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध उघड केले आहेत. मलिक यांनी देशाच्या गुन्हेगारांसोबत केलेले व्यवहार पुराव्यानिशी समोर आले आहे. आता मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणार का?, असा सवाल भाजपने विचारला आहे. तसेच, मुख्यंत्र्यांनी आता मलिकांविरुद्ध FIR दाखल करावा, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली आहे.
मुंबईत स्वत:ची खोलीसुद्धा मालकी हक्कावर मिळवण्यासाठी मालक तयार नसतो, अशी अनेक उदाहरणं मुंबईत आहेत. पण, नवाबी भाडेकरू असा नवीन झालाय, ते ज्या इमारतीत भाडेकरू होते, ती इमारत तर दिलीच, अजून दोन इमारती दिल्या, झोपडपट्टी दिली, मोकळ्या जागा दिल्या तेही 30 लाखात. त्यापैकी, 20 लाख रुपयेच दिले, असे नवाबी भाडेकरू मुंबईत शोधून सापडणार नाहीत. हा मुंबईतील भाडेकरूंचा अपमान आहे. तर, सरदार शहावली खान हा वॉचमन असल्याचं मलिकांनी सांगितलं. मुंबईतील वॉचमनला हा नवीन धंदा शिकवतायंत का, वॉचमन आता इमारतीच्या जागेवर, 7/12 वर कुठलाही व्यवहार न करता, पैसे न देता नाव चढवू शकतात. नवाबी भाडेकरू, नवाबी दर आणि नवाबी धंदा, यावर मुंबईकर विश्वास ठेवूच शकत नाही, असे आशिष शेलार यांनी म्हटलं.
स्वत: मंत्री महोदयांनी कबुली दिलीय, सरदार शहावली खानशी व्यवहार झालाय. सरदार खानचा 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्ह्यात सहभागी होता, ही कबुली दिलीय. सलीम पटेलशीही पॉवर ऑफ अटॉर्नीमुळे व्यवहार केल्याची कबुली दिलीय. त्यामुळे, राज्याच्या प्रमुखांकडे आमची एकच मागणी आहे. मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मंत्रीमंडळातील मंत्री कुबली देत आहेत, मग आता FIR दाखल करुन नवाब मलिक यांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी दिली आहे.
फडणवीसांच्या आरोपावर काय म्हणाले मलिक
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना आरोप करून राईचा पर्वत केला. देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. मात्र त्यांनी कुठे जायचे असेल, तिथे जावे आम्ही तयार आहोत. फडणवीस यांनी खोट्याचं अवडंबर माजवण्याचे काम केल्याचे मलिक यांनी म्हटले. तसेच, सलीम पटेल आणि सरदार वली खानबद्दलही माहिती दिली. सरदार वली खानचे गोवावला कंपाऊंडमध्ये आजही घर आहे. गेल्या 70 वर्षांपासून त्याच कंपाऊंडमध्ये वली खानचे वडील हे गोवावाल परिवारासाठी एका वॉचमनचं काम करत होते. जेव्हा आम्ही गोवावाला कुटुंबीयांकडून ही संपत्ती घेतली, त्यावेळी वली खान यांनी 300 मीटर जागेवर आपलं नाव लावून घेतलं होतं. ज्यावेळी आम्ही नोंदणी कार्यालयात गेलो, तेव्हा 300 मीटरचे पैसे देऊन आम्ही जागा विकत घेतल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. आम्ही कुठल्याही दबावात किंवा अंडरवर्ल्डशी कनेक्शन असलेल्या आरोपींकडून आम्ही ही जागा विकत घेतली नाही, असे मलिक यांनी सांगितले. आम्ही पूर्णपणे भाडेकरू होतो, जागेच्या मालकीनीने आम्हाला जागा विकत घेण्याचं सांगितलं, तेव्हा तेथील वॉचमनने जागेवर आपलं नाव लावलं होतं, म्हणून आम्ही त्यास पैसे दिल्याचं मलिक यांनी स्पष्टीकरण दिलंय.
सलीम पटेलबद्दल मला माहिती नाही
सलीम पटेल हे गोवावाला कुटुंबीयांशी संबंधित होते, त्यामुळे त्यांच्याकडून मालकी हक्क घेण्यासाठी आम्ही जागेची खरेदी नोंदणी केल्याचं मलिक यांनी म्हटलं. मी हसीना पारकरला ओळखत नाही, कुठल्याही अंडरवर्ल्ड गँगवारशी आपला संबंध नाही, असे मलिक यांनी म्हटले. मी कुठलिही चूक केली नाही. सलीम पटेल अब्स्कॉन्डींग किंवा ते कुख्यात गुंड आहेत, याची मला कुठलिही माहिती नाही, असे मलिक यांनी म्हटले आहे. तसेच, टाडा लागलेल्या गुन्हेगारासंदर्भात तसा कुठलाही कायदा नाही, असेल तर त्यांनी तशी कारवाई करावी, असेही मलिक यांनी म्हटले.
हा भिजलेला फटका, मी उद्या बॉम्ब फोडणार
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर नवाब मलिक म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना आरोप करून राईचा पर्वत केला. देवेंद्र फडणवीस हे कागदपत्रे तपास संस्थांकडे देण्याचा इशारा देत आहेत. मात्र त्यांनी कुठे जायचे असेल, तिथे जावे आम्ही तयार आहोत. फडणवीस यांनी खोट्याचं अवडंबर माजवण्याचे काम केले आहे. आज फडणवीस यांनी बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. मात्र त्यांचा फटाका भिजलेला निघाला. आता उद्या सकाळी मी अंडरवर्ल्डशी संबंधांचा हाड्रोजन बॉम्ब फोडणार आहे. अंडरवर्ल्डच्या माध्यमातून शहराला कुणी ओलीस धरले होते. कुठला आंतरराष्ट्रीय डॉन भारताता आला होता. तो कोणासाठी काम करत होता, हे उद्या उघड करणार आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.