रायगड : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा (ST bus strike) उद्रेक रायगड जिल्ह्यातील अलिबाग आगारात पहावयास मिळाला. संपूर्ण राज्यात एसटीची चाके थांबलेली असताना परळ आगरातून एसटी वाहक चालकाच्या जोडीने एसटी थेट अलिबागच्या दिशेने आणली. या रागातून संतप्त कर्मचाऱ्यांनी त्याला प्रथम कार्लेखिंड येथे मारहाण केली. त्यानंतर अलिबाग एसटी आगारात आणून चालकाला हळदी कुंकू लावून बांगड्या भरल्या. तर महिला वाहकाचे हळदी कुंकू केले. एवढ्यावर न थांबता कर्मचाऱ्यांनी त्यांना खडेबोल सुनावले. याप्रकरणी चालक वाहकांनी थेट अलिबाग पोलीस ठाणे गाठले आणि झालेल्या अन्यायाबाबत तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली होती.
एसटी सेवेला शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीवर एसटी कर्मचारी कायम राहिले आहेत. प्रवासी सेवेसाठी काही दिवस संप मागे घेऊन कर्मचाऱ्यांनी प्रवाश्यांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य सत्यात उतरविले होते. एवढे करूनही विलिनीकरणाबाबत कोणताच निर्णय न झाल्याबे रायगड जिल्ह्यातील सर्व आगार संपावर गेले आहेत. आता आरपारची लढाई अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी पहाटे चार वाजल्यापासून संपात सहभाग नोंदवला.
विलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या संपावर (ST bus strike) अद्यापही तोडगा निघालेला नाही. राज्यातील विविध विभागांतील ५९ डेपो शुक्रवारी बंद होते. ती संख्या वाढून शनिवारी ६५ पर्यंत पोहोचली, तर रविवारी बंद डेपोंची संख्या थेट १५० वर गेली. सोमवारीही बहुतांश डेपो बंद होते. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.