तेल्हारा: (शुभम सोनटक्के) : दीपावली प्रकाशाचा, आंनदाचा उत्सव म्हणून देशभर साजरा केला जातो. ह्या प्रकाश पर्वात अंधकारमय आयुष्य जगणाऱ्या सातपुडा पर्वत रांगांच्या पायथ्याशी शेतशिवारात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबांसोबत जागर फाउंडेशनने धनत्रयोदशीला दीपोत्सव साजरा करत निराधारांच्या अंगणी आनंददीप चेतवला.
मोल मजुरी करून चरितार्थ चालवणाऱ्या आदिवासी कुटुंबातील लेकरांना सुवासिक उटणे लावत अभ्यंगस्नान घालून नवीन कपडे देण्यात आले. भेटवस्तू, मातांना साडी, दिवाळी फराळ देऊन प्रकाशपर्वास सुरुवात केली. तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे आयोजित ह्या कार्यक्रमात आदिवासी परिवारासोबत जेवण करून स्नेहभाव सुद्धा जपण्यात आला.
जागर फाउंडेशन दरवर्षी रद्दी संकलित करून आलेल्या रकमेतून निराधारांची दिवाळी हा उपक्रम राबवित असते.आदिवासी कुटुंबासोबतच यंदाची दिवाळी लघू व्यवसायी (दृष्टीहीन) दिव्यांगांसोबत साजरी कारण्यात येत आहे. त्यांना व्यवसायासाठी लागणारे साहित्य दिवाळी पाडव्याला भेट देऊन दिव्यांग व्यक्तींच्या आत्मनिर्भरतेची वाट बळकट करणार आहे.
खंडाळा येथे आयोजित अभ्यंगस्नान सोहळ्यात एकोणतीस आदिवासी कुटुंबांनी सहभाग घेतला. या कुटुंबातील सर्वांना नवीन कपडे, जेवण देण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील सामाजिक कार्यकर्ते यासह, उपसरपंच सिंधू वानखडे, ठाणेदार धीरज चव्हाण, पोलीस पाटील अरुण तायडे, समता परिषद जिल्हाध्यक्ष माया इरतकार, गजानन वानखडे, सुधीर फुलके, केंद्रप्रमुख गजानन गायगोळ, नागोराव खारोडे, दीपक साबळे, मनोहर गोलाईत, शैला खंडेराव, प्रशांत आंबुसकर, मुख्याध्यापिका शीला टेंभरे उपस्थित होते. जागर फाउंडेशनचे संयोजक तुळशिदास खिरोडकार, गोपाल मोहे, सुरेखा ब्रम्हदेव हागे, उमेश तिडके, दीपक पोके, अरुण निमकर्डे, निखिल गिऱ्हे, राजेंद्र दिवनाले, प्रवीण. चिंचोळकर, सुनील धुरडे, नितीन धोरण, अमर भागवत, मनोहर शेळके, गोपाल भुजबले, नयना सरोदे, संतोष वैतकार, दीपक धुळ, संतोष मोरे, दिनकर धुळ यांनी कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला.
निराधार मुले, विधवा भगिनी तसेच भामरागड येथील आदिवासी बांधवांसोबत यापूर्वी जागर ने दिवाळी साजरी केली. या उपक्रमातून जागरने विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्य, स्वेटर, ब्लॅंकेट्स, शिलाई मशीन, दळणयंत्र तसेच 100 बैल यासह अनेक गरजेच्या वस्तूचे वितरण केले आहे.
यंदाची दिवाळी दृष्टीहीन दिव्यांगांसोबत साजरी करण्यात येत आहे. रेल्वे तसेच रस्त्यावर विविध वस्तू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दिव्यांग दृष्टीहीनांना व्यवसायासाठी आवश्यक साहित्य रद्दी विक्रीतून आलेल्या रकमतून भेट देण्यात येणार आहे.