मुंबई : राज्य सरकारच्या वीज कंपन्यांमधील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
वीज कंपन्यांमध्ये वर्ग १ ते चतुर्थ श्रेणीतील सर्व अधिकारी,कर्मचारी यांना १२ हजार तर सहायक कर्मचाऱ्यांना ७ हजार, २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.
सुरुवातीला वर्ग १ व २ च्या अधिकारी यांना वगळून १० हजार सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी ठेवला. मात्र कामगार संघटनांनी या प्रस्तावाशी असहमती व्यक्त करून ऊर्जामंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कामगार संघटनांशी चर्चा केल्यावर व त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर त्यांनी ऊर्जा विभागाच्या प्रस्तावात गेल्या वर्षीच्या दिवाळीप्रमाणे याही वर्षी सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा केली.
मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना २० हजार बोनस
कोरोनाच्या महामारीमुळे मुंबई महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. त्यामुळे यंदा महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त गेल्यावर्षी इतकाच १५ हजार ५०० रुपये बोनस (सानुग्रह अनुदान ) देण्यात येणार होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर तब्बल २० हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. पालिकेच्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही १० रुपये बोनस देण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर झालेल्या महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या वेळी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल व कामगार नेते उपस्थित होते.