कोल्हापूर : देवकर पानंद परिसरातील मनोरमानगर मोहिते मळा नजीक 40 वर्षीय महिलेचा खून करून पोत्यात भरून मृतदेह कचरा कोंडाळ्यात टाकल्याची टाकल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयाकडे हलविण्यात आला. सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे.
किमान चार ते पाच दिवसांपूर्वी हा मृतदेह येथे आणून टाकण्यात आला असावा असा पोलिसांचा संशय आहे. ही महिला शहराबाहेरील अथवा कर्नाटकातील असावी असा पोलिसांचा संशय आहे. देवकर पानंद परिसरात दोन दिवसापासून दिवाळीची धामधूम सुरू असतानाच मोहिते मळा लगत कचरा कोंडाळ्यात रविवारी रात्रीपासून दुर्गंधी येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले .
भटके जनावर मृतावस्थेत कचराकुंडीत पडले असावे असा कयास होता. नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार केली होती. आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन कोंडाळ्यातील कचरा बाहेर काढत असतानाच येथे भरलेले पोते आढळून आले.
या पोत्यात हात पाय बांधलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळून आला. कर्मचाऱ्यांनी तात्काळ जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे संपर्क साधून माहिती दिली.
शहर पोलीस उपाधीक्षक मंगेश चव्हाण पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला महिलेचा खून करून मृतदेह पोत्यात भरून येथे टाकून देण्यात आल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली.
अन्य ठिकाणी महिलेचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने संशयिताने मृतदेह पोत्यात भरून देवकर पानंद येथील मनोरमानगर येथे टाकून दिला असावा असा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना संशय आहे.