मुंबई : ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांनी चेष्टा केली आहे. कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून सरकारने तब्बल 750 रुपये जाहीर केलेत. बरं त्यासाठीही त्यांनी अनेक नियम अटी शर्थी ठेवल्या आहेत.
कोरोनाकाळात स्वत:चा, आपल्या कुटुंबाचा, आप्तेष्ठांचा विचार न करता हेच मुंबई पोलिस दिवसरात्र काम करत होते. मात्र सरकारने 750 रुपयांचा बोनस जाहीर करुन पोलिसांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यातील इतर विभागातील कर्मचाऱ्यांना बऱ्यापैकी चांगली रक्कम दिवाळी भेट देण्यात आली आहे. मात्र मुंबई पोलिसांच्या बाबतीत सरकारने त्यांना 750 रुपये भेट देऊन त्यांच्यावर अन्याय केला आहे. पोलिसांना तुटपूंजी भेट जाहीर केल्याने पोलिसांमध्ये नाराजीचं वातावरणं आहे.
मुंबई पोलिसांना दिवाळी भेटीच्या निमित्ताने सबसिडी कँटिनमधून त्याच्या नावे डेबिट व क्रेडिट कार्डवर 750 रुपये (प्रति कर्मचारी) इतक्या रकमेची खरेदी विनामूल्य करता येणार आहे. ही भेट पोलिसांसाठी असलेल्या पोलीस कल्याण निधीतून दिली जाणार आहे.
ठरलेल्या रक्कमेच्या वरती खरेदी केल्यास ते पैसे त्यांना स्वत: द्यावे लागणार आहे. हे पत्र मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या नावे काढण्यात आलं आहे. पालिका, बेस्ट कर्मचारी आणि इतर शासकीय कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून चांगली रक्कम दिली जात असताना पोलिसांना मात्र 750 रुपये दिवाळी भेट देऊन सरकारने त्यांची चेष्टाच केली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर पोलिस दलामध्ये नाराजीचं वातावरण आहे.