मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी आर्यन खान याला ( aryan khan cruise drugs case ) गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. अखेर सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्याची शनिवारी सकाळी मुंबईत आर्थर रोड कारागृहातून सुटका करण्यात आली.
जामीन मंजूर झाल्यानंतर शुक्रवारी सत्र न्यायालयातील जामीनपत्र भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे जामिनाची कागदपत्रे मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील पेटीत जमा होवू शकली नाहीत. त्यामुळे आर्यनची सुटका लांबणीवर पडली होती. शनिवारी सकाळी जामीन पेटीत कागदपत्रे जमा झाली आहेत. सकाळी दहापर्यंत त्याची सुटका होईल, अशी अशी माहिती कारागृहाच्या सूत्रांनी दिली.
aryan khan cruise drugs case : आर्थर रोड कारागृहाबाहेर गर्दी
अभिनेता शाहरुख खान हा सकाळीच आपल्या मन्नत बंगल्यातून आर्थर रोड कारागृह परिसरात आला होता. शाहरुख खानचा अंगरक्षक रवी याच्यासाेबत आर्यन खान कारागृहाबाहेर आला. यानंतर ताे शाहरुख खान समवेत मन्नतला रवाना झाला. यावेळी आर्थर रोड कारागृहाबाहेर माेठी गर्दी झाली हाेती.
ड्रग्ज प्रकरणी अटक झालेल्या आर्यन खानची जामीनावर सुटका करताना न्यायलयाने एकुण १४ अटी ठेवल्या आहेत. न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्याला देशाबाहेर जात येणार नाही. तसेच आर्यन खानकडून जामीनासाठीच्या अटींचा भंग झाल्यास त्याची जामीन रद्द करावी, अशी मागणी एनसीबी करु शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहून आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे लागेल. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबीला जामीन रद्द करण्याची विनंती करण्याचा अधिकार असेल. आर्यन खान याला दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
‘एनसीबी’ने केला होता जामिनास विरोध
गुरुवारी सलग तिसर्या दिवशी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्यासमोर आर्यन खानच्या याचिकेवर सुनावणी झाली होती. यावेळी एनसीबीच्या वतीने युक्तीवाद करताना अतिरिक्त सॉलिसिएर जनरल ( एएजी) अनिल सिंग म्हणाले होते की, आर्यन खान मागील दोन वर्षापासून तो नियमित ड्रग्जचे व्यसन करत आहे. मागील दोन वर्षांमध्ये त्याने मोठ्य्या प्रमाणावर ड्रग्ज विकत घेतले आहे. तो ड्रग्ज सेवनाबरोबरच त्याची विक्रीही करत होता. ड्रग्ज रॅकेटचा तो भाग आहे, असे सांगत त्याला जामीन देण्यात येवू नये, अशी मागणी त्यांनी केली होती.