कोपरगाव: रस्त्याला खड्डे पडले असून या बाजूने गाडी घेऊन यायचं नाही. समृद्धी महामार्गाच्या गाड्या इकडे आणायच्या नाहीत, तू गाडी का आणली”, असा प्रश्न विचारत एका चालकाला बेदम मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे.
या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, जगबीर सिंग राम किसन सिंग (वय 56. रा. B2 208 ब्लॉक, रोहिनी एक्सटेन्शन दिल्ली) हे बुम प्रेशर गाडी क्रमांक 13 BD 5569 ही गुरुवार (28 ऑक्टो) रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास भोजडे चौकी रस्त्यावरून जाणाऱ्या गावाच्या शिवारात वादे यांच्या पोल्ट्री जवळ जात असताना ही घटना घडली.
त्या परिसरातील सचिन सुदामराव खटकाळे (वय-34, रा. खटकाळे वस्ती) आणि नितीन सोमनाथ पवार (वय-23 मयुरनगर) यांनी चालक जगबीर सिंग राम किसन सिंग याला अडवून शिवीगाळ केली. “रस्त्याला खड्डे पडले असून या बाजूने गाडी घेऊन यायचं नाही. समृद्धी महामार्गाच्या गाड्या इकडे आणायच्या नाहीत, तू गाडी का आणली”, असं म्हणतं चालकाच्या छाती आणि पोटात लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्यात चालकाचा मृत्यू झाला, अशी फिर्याद क्लीनर कुंदन सुरेश कुमार (वय-25) यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात दिली.
त्यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सचिन खटकाळे आणि नितीन पवार या दोघांना अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, सहाय्यक पोलीस निरीक्षक आव्हाड नागरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. पुढचा तपास पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.