मुंबई : ड्रग्ज केस प्रकरणी मागील 25 दिवसांपासून कोठडीत असणाऱ्या आर्यन खान याला अखेर उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिला आहे. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी मन्नतवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी न्यायालयात हजर आहेत. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली.
ड्रग्ज केस प्रकरणी कोठडीत असणाऱ्या तिघांच्याही सुटकेचे आदेश शुक्रवारी किंवा शनिवारी मिळणार असून तेव्हाच ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती बचावपक्षाच्या वकिलांनी दिली.
एनसीबीनं, सदर प्रकरण हा अजामीनपात्र गुन्हा असल्याचा युक्तिवाद केला होता. पण, अखेर आर्यन खानसह इतर दोघांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दरम्यान सदर प्रकरणी आता एनसीबी पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. तूर्तास शाहरुख खानला मोठा दिलासा मिळाला असून, आता त्याच्या मुलाची म्हणजेच आर्यन खानची दिवाळी मन्नतवरच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.