आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) हे महाराष्ट्र सरकारच्या निशान्यावर आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडेंवर गंभीर आरोप करत कागदोपत्री तसेच फोटो, व्हिडीओद्वारे पुरावे दिले आहेत. यामुळे समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनाच थेट पत्र लिहिले आहे. यामध्ये तिने शिवसेनेच्या राज्यात एका महिलेच्या प्रतिष्ठेसोबत खेळ खेळला जात आहे, आज बाळासाहेब असते तर त्यांना हे अजिबात सहन झाले नसते, असे म्हटले आहे.
आमचा लोकांसमोर दररोज अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात स्त्रीच्या प्रतिष्ठेशी खेळले जात आहे. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांना ते आवडले नसते. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. मला आतापर्यंत प्रतिसाद मिळालेला नाही, मी उत्तराची वाट पाहत आहे, असे क्रांती रेडकर म्हणाली.
पत्रात म्हटलेय की, शिवसेनेला मराठी माणसासाठी लढताना पाहत मी मोठी झाली आहे. मी मराठी मुलगी आहे. बाळासाहेब, शिवाजी महाराजांकडून शिकले की, कोणावर अन्याय करू नका, स्वत:वर अन्याय झाला तर सहन करू नका. त्याच ताकदीवर मी आज एकटी माझ्या खासगी आयुष्यावर हल्ला करणाऱ्या लोकांविरोधात मजबुतीने उभी आहे आणि लढत आहे.
सोशल मीडियावर लोक केवळ मजा पाहत आहेत. मी एक कलाकार आहे, राजकारण मला समजत नाही आणि त्यात पडायचे देखील नाही. आमचा काही संबंध नसताना रोज सकाळी आमची इज्जत चव्हाट्यावर मांडली जात आहे. शिवसेनेच्या राज्यात असे होत आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना हे अजिबात आवडले नसते, असे क्रांती रेडकरने म्हटले आहे.