मुंबई: शाळांना देण्यात आलेल्या दिवाळीच्या सुट्ट्या सहा दिवसांनी कमी करण्यात आल्यामुळे राज्यभरातील शिक्षक-विद्यार्थ्यांना पायात फटाके वाजावेत, असा धक्का बसला आहे.
दिवाळीसाठी 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार शाळांनी परीक्षांचे आयोजन करुन 30 ऑक्टोबरपर्यंत सत्र परीक्षा घेण्यात येणार असल्याचे सोमवारी जाहीर केले.
मात्र, बुधवारी शालेय शिक्षण विभागाच्या सहसचिवांनी अचानक दिवाळीचा सुट्टीचा कालावधी राज्यभरात सारखा केला आणि 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर अशी सुधारित दिवाळीची सुटी जाहीर केली. त्यामुळे सुट्टीचा कालावधी कमी झाला असून त्याचबरोबर शाळांमधील परीक्षांचे वेळापत्रकही कोलमडणार आहे. सुट्टीच्या या सुधारित परिपत्रकाला विरोध करत शिक्षक संघटनांनी संताप व्यक्त केला आहे.
माध्यमिक शाळा संहितेनुसार सुट्टी देण्याचे अधिकार शाळांना असताना व त्यानुसार या अगोदर सुट्टी जाहीर झाली असताना दिवाळी सुट्टी 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर असा बदल करून शिक्षण सहसचिवांनी गोंधळ का घातला?
आधीच्या घोषित सुट्ट्या विचारात घेऊन 30 ऑक्टोबर पर्यंत प्रथम सत्र परीक्षेचे आयोजन शाळांनी केले असताना आता 28 पासून म्हणजे गुरुवारपासूनच सुट्ट्या द्याव्या लागणार. मग परीक्षेचे काय?
पालकांनी व शिक्षकांनी गावी जाण्याचे नियोजन केले आणि त्यासाठी रेल्वे व बसचे आरक्षण केले आहे. ते नुकसान कोण भरून देणार?
दीर्घ सुट्ट्यांचे नियोजन संचालक स्तरावर तर दैनंदिन सुट्ट्यांचे नियोजन शाळा -महाविद्यालयस्तरावर केले जाते परंतु आता विभागाकडून हे निर्णय लादले जात आहेत. ते कशासाठी?