हिवरखेड (धीरज बजाज): ऐन दिवाळीच्या तोंडावरच हिवरखेड येथील पाणीपुरवठा विद्युत बिलाचा भरणा न केल्यामुळे बंद झाला आहे.
हिवरखेड हे जवळपास चाळीस हजार लोकवस्तीचे शहर असून येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या मालकीच्या फिल्टर प्लांट वरूनच पाणीपुरवठा केला जातो. नागरिकांना जीवनावश्यक असलेल्या पाण्यासाठी फिल्टर प्लांट शिवायगावात बोअरवेल, विहिरी असा दुसरा सक्षम पर्याय नसल्यामुळे येथील नागरिकांसमोर ऐन दिवाळीच्या तोंडावरच जलसंकट निर्माण झाले आहे. मागील गेल्या आठ महिन्यापासून हिवरखेड ग्रामपंचायत वर प्रहार, भाजप आणि काही पॅनल मिळून सत्ता असून हिवरखेड चा पाणीपुरवठा अनेक वेळा बंद खंडित करण्यात आला, असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामध्ये विद्युत बिलाचा पूर्ण भरणा न केल्यामुळे ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. दिवाळी निमित्त जवळपास नागरिकांनी आपल्या घरांची साफसफाई रंगरंगोटी करणे सुरू केले असून या काळात पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांनवर जलसंकट निर्माण झाले आहे.
नागरिकांना साधे पाणीही देण्यास ग्रामपंचायत सक्षम नसेल तर येथील लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अश्या संतप्त प्रतिक्रिया हिवरखेड वासीयांकडून खाजगीत बोलताना व्यक्त होत आहेत. ग्रामपंचायतीने निदान सणासुदीचा तरी विचार करून तात्काळ विद्युत बिलाचा भरणा करून पाणीपुरवठा सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना याबाबत दूरध्वनीद्वारे विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून रिस्पॉन्स मिळाला नाही.