पुणे: रेल्वे सिग्नलच्या वायरी कट करून सिग्नलला थांबलेल्या कोणार्क एक्स्प्रेस वर तिघा चोरट्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न करुन खिडकीतून दोन महिलांच्या गळ्यातील सव्वा लाखांचे मंगळसुत्र व साखळी हिसकावून पोबारा केला. चोरांचा पाठलाग करताना एका सेवा निवृत्त रेल्वे कर्मचार्याचा मुलगा केलेल्या हल्ल्यात जखमी झाला. ही घटना पुणे दौंड रेल्वेमार्गावरील नानविज फाट्याजवळ मध्यरात्री पावणे नऊ वाजता घडली. दौंड रेल्वे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
विनायक श्रीराम (वय २७, रा. सोलापूर) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्क एक्स्प्रेस रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवरुन सुटली. रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास ती दौंड रेल्वे स्टेशनजवळच्या नानविज फाटा येथे आली. याच दरम्यान चोरट्यांनी सिग्नलच्या वायरी कट केल्याने एक्स्प्रेस तेथेच यांबली होती.
एक्स्प्रेस थांबल्यांन अंधारात तिघां चोरट्यांनी एस ४ या डब्यात खिडकीत बसलेल्या महिलेल्या गळ्यातील ११ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावले. यावेळी या महिलेने आरडाओरडा करताच चोरट्यांनी तेथून पळ काढत पुढे एस – १ डब्यातील दरवाज्यात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन लांबविली.
यानंतर बहिणीची चैन हिसकाविल्याने सेवा निवृत्त रेल्वे कर्मचार्याचा मुलगा विनायक श्रीराम याने रेल्वेतून खाली उतरून चोरांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. याच दरम्यान चोरट्यांनी रेल्वेमार्गावरील दगड उचलून विनायकला मारले. त्यात त्यांच्या पायाला दगड लागून तो जखमी झाला. चोरटे अंधाराचा फायदा घेवून पळून गेले.
विनायक श्रीराम हे आपल्या बहिणीसह सोलापूरला जात असताना ही घटना घडली आहे. विनायकवर दौंड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर गाडी सोलापूरला रवाना झाली आहे. सहायक पोलीस निरीक्षक युवराज कलबुर्गी या घटनेचा तपास करीत आहेत.