औरंगाबादः शहरातील किराडपुरा भागातील (Aurangabad Kiradpura) उघड्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर स्त्री जातीचे अर्भक रविवारी आढळून आले. या परिसरातील मुले खेळत असताना त्यांना हे बाळ दिसले. त्यांनी तत्काळ याची माहिती मोठ्या व्यक्तींना दिली. नागरिकांनी पोलिसांना (Aurangabad police) सांगून या बाळाला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र सोमवारी मध्यरात्री उपचार सुरु असताना या बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या बाळाला फेकणाऱ्या अज्ञात मातेचा शोध पोलीस घेत आहेत. शनिवारी सिडको एन6 भागात एका अर्भकाला उघड्यावर सोडून दिल्याची घटना ताजी असतानाच रविवारी हा प्रकार घडल्याने औरंगाबाद शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत्यू झालेले नवजात बाळ हे प्रसूतीच्या योग्य वेळेआधीच जन्मले असावे, असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
किराडपुऱ्यातील घटना
शहरातील किराडपुऱ्यातील अक्सा मशिदीजवळ राहणारे अय्युब खान युसूफ खान हे रविवारी काम आटोपून घरी परतत होते. तेव्हा रात्री दहा वेजाच्या सुमारास त्यांना परिसरात गोंधळ ऐकू आला. घराच्या बाहेर येऊन पाहिले असता तिथे काही महिला व लहान मुले जमली होती. या मुलांना विचारले असता, तेथे खेळणाऱ्या काही लहान मुलांना पाण्याच्या बंबाजवळील मोकळ्या मैदानात एका कचराकुंडीजवळ बाळ असल्याचे कळले. अय्युब हे आणखी काही मित्रांना घेऊन तिकडे गेले असता या नवजात मुलीला येथे सोडून दिल्याचे कळले. काही महिलांच्या मदतीने या नवजात मुलीला कपड्यात गुंडाळले. जिन्सी पोलिसांना घटना कळताच उपनिरीक्षक अशफाक शेख व त्यांच्या पथकाने बाळाला घाटीत दाखल केले.
अज्ञात महिलेवर गुन्हा
जिन्सी पोलिसांना ही घटना कळाल्यानंतर या नवजात बाळाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तत्काळ बाळावर उपचार सुरु केले. मात्र सोमवारी मध्यरात्रीच उपचारादरम्यान या बाळाचा मृत्यू झाला. जिन्सी पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरुद्ध याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच उपनिरीक्षक शेख हारूण या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. प्रसूतीच्या योग्य मुदतीच्या आधीच या बाळाचा जन्म झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे.
पहाटेच्या सुमारास तरुणाला मारहाण व लूट
शहरातील अन्य एका घटनेत, आरोग्य विभागाची परीक्षा देऊन पहाटे शहरात परतलेल्या उद्धव पंडितराव जाधव (३५, रा. गजानन कॉलनी) यांना सेव्हन हिल्स परिसरात चौघांनी बेदम मारहाण करून लुटले. झेरॉक्स सेंटरचा व्यवसाय असलेले उद्धव 24 ऑक्टोबर रोजी मित्रांसोबत सातारा जिल्ह्यातील वाई येथे आरोग्य विभागाची परीक्षा देण्यासाठी गेले होते. 25 ऑक्टोबर राजी पहाटे चार वाजता शहरात परतल्यानंतर मित्र सुभाष मुंढे यांनी त्यांना सेव्हन हिल्स उड्डाणपुलाखाली सोडले. तेथून ते पायी घराकडे निघाले. गजानन महाराज रस्त्यावरील गॅस पंपासमोर एका दुचाकीवर बसलेले चार तरुण त्यांच्यासमोर आडवे आले. त्यांनी अचानक मारहाण सुरू करताच उद्धव यांनी पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी पाठलाग करून पकडले व बॅग हिसकावली. त्यात काही न मिळाल्याने हातचापटाने मारहाण करून खाली पाडले. एकाने त्यांच्या खिशातील २,४०० रुपये काढून पोबारा केला. पंपावर काम करणाऱ्या अजय बनकर यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. उद्धव यांनी त्यांच्या मोबाइलवरुन वडिलांना व पोलिसांना कॉल करून घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.