अकोला,दि.२7: येणाऱ्या दिवाळीत वसुबारस साजरी करतांना जनतेने तसेच ग्रामपंचायत व विविध संस्थांनी दि. १ नोव्हेंबर रोजी जनावराचे पाणवठे स्वच्छ व निर्जंतुकीकरण करण्याची मोहिम राबवावी असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची सभा (दि.२३ रोजी) पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
शनिवार दि.२३ रोजी जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक समितीची सभा संपन्न झाली. या सभेस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. तुषार बावने, सहयोगी अधिष्ठाता, पदव्युत्तर पशुवैद्यकीय संस्था डॉ. मिलींद थोरात, पशुधन विकास अधिकारी डॉ. योगिराज वंजारे, उपआयुक्त मनपा पुनम कळबे, एपीआय महेश गावडे, वनविभागाचे आर.एन. ओवे तसेच कु. राखी वर्मा व डॉ. प्रवीण बनकर, प्रकाश वाघमारे, विजय शिवशंकर जाणी, भुषण पिंपळगावकर, विशाल गोरे, सुधीर कडू, सचिन आयवडे, यांची उपस्थिती होती.
यावेळी झालेल्या चर्चेत जंगली जनावरांचा गावात प्रवेश थांबविण्याकरिता गावा जवळच्या जंगलामध्ये प्राण्यांसाठी पाणवठा तयार करणे व त्यासाठी गावांची निवड करण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यामध्ये कानशिवणी गावाच्या अंर्तभाव करावा, असे सुचित केले. गायरान अतिक्रमण असलेल्या गावांमध्ये स्थानिक रहिवाशांचे अतिक्रमण काढणेबाबत कारवाई करण्यात यावी असेही सांगण्यात आले. उघडयावर मांस विक्री दुकाने बंद करुन तसेच शहराची लोकसंख्या व भोगोलीक स्थिती पाहता. ताजनापेठ मटण मार्केट प्रमाणे शहरात इतर ठिकाणी जागा उपलब्ध करण्याबाबत महानगरपालिका यांनी पुढील कार्यवाही करावी असे सांगितले. तसेच कापशी तलाव येथे प्राण्याबाबत सुविधा उपलब्ध करणे बाबत चर्चा करण्यात आली.प्राण्यावरील क्रूरता, प्राणी संरक्षण कायदे तसेच प्राण्याबाबत संवेदनशिल असणारा नागरिकाचे संरक्षण या बाबतचे प्रशिक्षण घेण्याबाबत निर्देश दिले.