यवतमाळ : शेतात काम करणाऱ्या एका तरुणीने थेट बिबट्याशी दोन हात करत आपला जील वाचवल्याची थरारक घटना यवतमाळ येथे घडली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील करंजखेड येथे ही घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं, तरुणीने आपला जीव कसा वाचवला?
महागाव तालुक्यातील करंजखेड येथे वृषाली नीलकंठ ठाकरे ही तरुणी शेतात काम करत होती. शेतात काम करत असताना अचानक एका बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. यावेळी या तरुणीने मोठं शौर्य दाखवलं. यावेळी तिच्या आणि बिबट्यामधील थरार पाहायला मिळाला.
या बिबट्याने तरुणीचा थेट गळा धरला. तेव्हा तिने कळशीने बिबट्याचे डोकं फोडले. कळशी डोक्यावर मारुन तिने बिबट्यापासून स्वत:ची सुटका केली. या तरुणीच्या धाडसाने तिने पुढे आलेला मृत्यू परतविला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील करंजखेड येथे ही घटना घडली. बिबट्यासोबतच्या या झटापटीत वृषाली जखमी झाली असून तिला सध्या उपचारासाठी यवतमाळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.
वृषाली नीलकंठ ठाकरे ही पुसदला फार्मसीचे शिक्षण घेत आहे. तसेच, ती अधूनमधून शेतात घरी कामाला सुद्धा कुटुंबाला मदत करत असते.