महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं (MPSC) शुक्रवारी महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 करिता उपस्थित उमेदवारांची स्कॅन उत्तरपत्रिका, गुण व गुणांची सीमारेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय एमपीएससीनं घेतला आहे. देशात अशाप्रकारचा पहिलाच प्रयोग असल्याचा दावाही करण्यात येत आहे.
उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज आणि गुण आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी पूर्व परीक्षा 2020 या परिक्षेच्या निकालापासून याची सुरुवात होणार आहे. देशात प्रथमच असा प्रयोग, यामुळे निकालात पारदर्शकता येणार असल्याचं बोललं जात आहे. गुणपत्रिकेची स्कॅन कॉपी उमेदवारांना उपलब्ध करून दिल्यामुळे उमेदवारांना आपल्याला किती गुण मिळाले हे समजणार आहे.
गुणांची किमान सीमांकन रेषा आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर Online Facilities मधील Marksheet या पर्यायामध्ये उपलब्ध असेल. कसं पाहाल…
आयोगाच्या संकेतस्थळावर जा
Online Facilities मधील Marksheet वर क्लिक करा…
उपलब्ध होणाऱ्या परीक्षांच्या यादीमधून संबधित परीक्षेची निवड करा
परीक्षेच्या अर्जात नमूद केलेला मोबाईल क्रमांकाद्वारे ओटीपी टाकून लॉगइन करा
लॉग इन केल्यानंतर स्कॅन उत्तर पत्रिका आणि गुणपत्रक उपलब्ध करुन घेता येईल…
महत्वाचं… वरील प्रक्रियेस कोणतीही अडचण आल्यास आयोगाच्या 1800-1234-275 अथवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा [email protected] या मेल आयडीवर कळवावे.
दरम्यान, आगामी काळात आयोजित करण्यात येणाऱ्या लिपिक टंकलेखक व कर सहायक या पदांच्या भरतीकरिता मुख्य परीक्षेनंतर संगणक प्रणालीवर आधारित टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं घेतला आहे. सदर चाचणी पात्रता (Qualifying) स्वरूपाची असेल. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असं सांगण्यात आलेय. याशिवाय आगामी काळात आयोगामार्फत आयोजित सर्व स्पर्धा परीक्षांकरीता गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting out) पर्याय उमेदवारांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सविस्तर कार्यपद्धत स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल.