अकोला: दि.20: कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक असून याकरीता प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय सुरु झाले आहे. त्याअनुषंगाने शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्याशी दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधून लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज केले.
शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्याची दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक वंदना पटोकार-वसो, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माता व बाल विकास अधिकारी डॉ. मनिष शर्मा, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, मनपाचे डॉ. अनुप चौधरी तर दुरदृष्य प्रणालीव्दारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपविभागीय अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, आदी उपस्थित होते.
उच्च व तंत्र शिक्षण विभागाव्दारे बुधवार (दि.20) पासून सर्वत्र महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेता सर्व यंत्रणा व महाविद्यालयाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासंबंधित जिल्हाधिकारी यांनी शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्याशी संवाद साधून लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश द्यावे. याकरीता संबंधित विद्यार्थ्यांकडे लसीकरण प्रमाणपत्र असल्याची खात्री करा व लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवू नये. लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याकरीता प्रोत्साहित करुन त्यांच्याकरीता लसीकरण शिबीराचे आयोजन करा. याकरीता प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांचे लसीकरण झाले असल्याबाबत त्यांच्याकडून माहिती घ्या. लसीकरण न झालेल्या पालकांना लसीकरणाकरीता आवाहन करा. महाविद्यालयात शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व उपाययोजना राबवा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.