Vegetable Tomato Price Hike: पेट्रोल-डिझेल, गॅसनंतर आता भाज्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. वाढत्या महागाईनं सर्वसामान्य नागरिकांचं कंबरडं मोडलं आहे. देशातील काही शहरांमध्ये टोमॅटोचा दर चक्क पेट्रोल आणि डिझेलच्या दराइतका झाला आहे. टोमॅटोचा दर ५० रु. ते ९३ रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचला आहे.
अवकाळी पावसामुळे पीकांचं मोठं नुकसान झालं असून बाजारात भाज्या उशीरा पोहोचत असल्यानं दर वाढले आहेत. टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार कोलकातामध्ये टोमॅटोचा दर किरकोळ बाजारात प्रतिकिलो ९३ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्या डिझेलचा दरही शहरात ९२ ते ९५ रुपयांच्या घरात आहे. चेन्नईत सोमवारी टोमॅटोचा दर ६० रुपये प्रतिकिलो, दिल्लीत ५९ रु. प्रतिकिलो आणि मुंबईत ५३ रुपये प्रतिकिलो इतका नोंदवला गेला.
देशातील ५० पेक्षा अधिक शहरांमध्ये टोमॅटोचा दर वाढला
ग्राहक व्यवहार मंत्रालयानं देशातील १७५ शहरांमध्ये केल्या गेलेल्या ट्रॅकिंगनुसार एकूण ५० शहरांमध्ये टोमॅटोचा दर ५० रुपये प्रतिकिलो पेक्षाही अधिक नोंदवला गेला आहे. घाऊक बाजारातही टोमॅटोचा दर खूप जास्त आहे. घाऊक बाजारात कोलकातामध्ये टोमॅटोचा दर ८४ रुपये, चेन्नईत ५२ रुपये, मुंबईत ३० रुपये आणि दिल्लीत २९.५० रुपये प्रतिकिलो इतका आहे.
दरवाढीचं कारण काय?
अवकाळी पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे. टोमॅटोचं नवं पीक आता दोन ते तीन महिन्यांनंतर उपलब्ध होणार आहे. त्यानंतरच टोमॅटोच्या दरात घट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. चीननंतर भारत जगभरातील दुसरा सर्वाधिक टोमॅटो उत्पादक देश आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीपासून उत्तर प्रदेशपर्यंत भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. घाऊक बाजारापासून ते किरकोळ बाजारात भाज्यांचे दर प्रचंड वाढले आहेत. टोमॅटोचे दर सर्वाधिक वाढले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा परिणामही भाज्यांच्या दरवाढीवर पाहायला मिळतो आहे.