अकोला : शहरातील खदानच्या महिला एपीआय गस्तीवर असताना मद्यप्राशन केलेल्या युवकांना हटकल्याने पित्त खवळलेल्या एकाने पोलिसाशी हुज्जत घातली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खदान पोलिस स्टेशनला कार्यरत महिला सहायक पोलिस निरीक्षक योगीता ठाकरे आपल्या सहका-यांसह गस्तीवर असताना त्यांना काही युवक हंगामा करताना दिसले. पोलीस अधिकारी ठाकरे यांनी युवकांना घरी जाण्यास सांगितले असता इतर युवक घरी निघून गेले.
मात्र उमेश घुगे याने ड्युटीवर कार्यरत महिला अधिका-याशी अरेरावी करून हुज्जत घातली. वार्तालाप करताना त्याने मद्यप्राशन केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी संबंधित युवकास समजावले असता, त्याने अपशब्दाचा वापर केल्याने आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये खदान पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची तुरुंगात रवानगी केली.