ठाणे : भट्टीच्या तेलाने भरलेला टँकर घेऊन जाताना चालकाचा ताबा सुटल्याने टँकर रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकाला जाऊन जोरात धडकला. ही घटना (दि.१४) गुरुवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास गायमुख जकात नाक्याजवळ घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान घोडबंदर रोडवरील ठाण्याकडे येणाऱ्या रस्तावर मोठ्या प्रमाणात तेल सांडल्याने काही काळ वाहतूक खोळंबली होती.
पहाटे सहा वाजेपर्यंत ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाच्या पथकाने तो रस्ता धुवून काढला. त्यानंतर त्यांनी त्याच्यावर माती पसरवून तो रस्ता सकाळी वाहतुकीसाठी खुला केल्याची माहिती आपत्ती कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
शिळफाटा येथे वाहतूक खोळंबली
गुजरातहून घोडबंदर रोडने ठाणे मार्गे शीळफाटा येथे हा टँकर निघाला होता. यामध्ये २१ टन तेलसाठा असल्याचे सांगण्यात आले. गायमुख जकात नाक्याजवळ चालकाचा टँकरवरील ताबा सुटला. तो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुभाजकावर जाऊन जोरात आदळला. ही धडक इतकी जोरात होती की त्या टँकरमधून मोठया प्रमाणात तेल गळती झाली.यामुळे ठाण्याकडे येणारी वाहतूक पूर्णपणे खोळांबली होती.
या घटनेची माहिती मिळताच, ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल यांच्या कासारवडवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. अपघातामुळे रस्त्यावर मोठया प्रमाणात तेल पसरले. तातडीने तो रस्ता पाण्याच्या मदतीने धुवून काढण्याचे काम हाती घेण्यात आले.
एका मार्गाने वाहतूक
रस्त्यावर मातीचा टाकून त्यानंतर तो रस्ता सकाळी सहाच्या सुमारास वाहनांसाठी खुला करण्यात आला. रात्रभर एक मार्गिका बंद राहिला. सकाळच्या सुमारास घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे येणारी वाहतूक संथगतीने सुरू होती. यावेळी एक फायर इंजिन, एक जम्बो पाण्याचा टँकर आणि एक रेस्क्यू वाहन तसेच दोन जेसीबी यांना पाचारण केल्याची माहिती कक्षप्रमुख संतोष कदम यांनी दिली.