लासलगाव: सोमवारच्या महाराष्ट्र बंदमुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा आणि धान्याचा लिलाव एक दिवस बंद होता. यानंतर आज मंगळवारी (दि.१२) रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरू होताच उन्हाळ कांद्याला कमाल ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी दर जाहीर झाला.
एप्रिल ते जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात विक्री केलेला उन्हाळ कांद्याचा आता भाव वाढला आहे. शेतकऱ्यांनी चाळीत साठविलेल्या कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कर्नाटक, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, या भागात अतिवृष्टीमुळे नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर मागील दोन आठवड्यांपूर्वी कांद्याचे आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्येही अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
मागणीच्या तुलनेमध्ये काद्यांचा पुरवठा अत्यल्प होत असल्याने कांदा बाजार भावात तेजी दिसत आहे. आज मंगळवारी (दि.१२) रोजी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये प्रथम क्रमांकाच्या कांद्याला ४ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. तर लाल कांद्याला कमाल २ हजार ४०० रुपये भाव मिळाला.