Maharashtra Bandh Live अपडेट्स…
- मुंबई : महाराष्ट्र बंदचा बेस्टवर परिणाम, शहरातील विविध ठिकाणी 9 बस फोडल्या
मध्य, पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत सुरु - काल मध्यरात्रीपासून आज सकाळी पहाटेच्या दरम्यान बेस्टच्या ८ बसगाड्या आणि भाडेतत्वावरील एका बसगाडीची तोडफोड करण्यात आली आहे. धारावी, मानखुर्द, शिवाजी नगर, चारकोप, ओशिवरा, देवनार, इनॉर्बिट मॉल अशा विविध भागात या तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बेस्टच्या व्यवस्थापनाने पोलीस संरक्षण घेतले असून परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व आगारातून बसगाड्या चालवण्यात येत आहेत.
- कोल्हापूर : राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी महामार्ग रोखला
- सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात युवासेना आक्रमक, रस्त्यावर टायर जाळत महाराष्ट्र बंदला सुरुवात, शेतकरी जिंदाबादच्या घोषणा
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकर्यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. दरम्यान, राज्यातील बहुतांश ठिकाणी या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला मुंबई-पुण्यातील व्यापार्यांनी विरोध केला आहे. काळ्या फिती लावून दुकाने सुरूच राहतील, अशी भूमिका मुंबई व्यापारी संघामार्फत वीरेन शाह यांनी मांडली आहे.
लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणार्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, औषधालये, आवश्यक वस्तूंची वाहतूक वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, हा बंद महाराष्ट्र सरकारकडून नसून पक्षीय पातळीवर आहे. नागरिकांनी या बंदला पाठिंबा द्यावा, तसेच व्यापार्यांनी आस्थापना, दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन महाविकास आघाडीतील नेत्यांनी केले आहे.
राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने लखीमपूरच्या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय महाराष्ट्र बंदची घोषणा चार दिवसांपूर्वी केली होती. चौघा शेतकर्यांसह आठ जण या हिंसाचारात मृत्युमुखी पडले होते.
महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भाजपने जाहीर विरोध केला आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन लावून अनेकांची रोजीरोटी हिरावली होती. आता पुन्हा तसाच प्रकार केला जात आहे, असे आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले.