महिला चालकांसाठी पुणे विभागात प्रशिक्षण सुरू
पुणे : नारीशक्ती आज सर्वच क्षेत्रात सरस कामगिरी करत आहेत. चारचाकी वाहने, रिक्षांपासून रेल्वेचे सारथ्य महिला अनेक वर्षांपासून करत आहेत. आता त्यात एसटीची भर पडली असून, महिलांना एसटी बस चालवण्याचे प्रशिक्षण जोमाने दिले जात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत महिला एसटीचे सारथ्य करत असल्याचे चित्र पाहायला मिळणार आहे.
एसटी महामंडळात प्रशासकीय अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी, नियंत्रक आणि वाहक पदांवर महिला कार्यरत आहेत. दोन वर्षांपूर्वी महामंडळाने महिलांची चालक म्हणूनदेखील नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली.
दरम्यान, या महिला प्रशिक्षणार्थींचा 1 वर्षांचा प्रशिक्षण कालावधी नियोजित असून, त्यानुसार अर्ज मागवून पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे.पुणे विभागातील प्रशिक्षणात महिला चालकांच्या पहिल्या तुकडीत 29 जणींचा समावेश आहे. सर्वप्रथम ‘इन हाऊस’ प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये एसटीची माहिती, तांत्रिक माहिती, विभाग आदीची माहिती देण्यात आली. हे प्रशिक्षण एक महिन्याचे होते. तर सध्या विविध मार्गांवर प्रत्यक्षात वाहन चालवण्याचे प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण 60 दिवसांचे आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
राज्यात प्रशिक्षणार्थी उमेदवार 194
पुणे विभागासह महामंडळाच्या 21 विभागांमध्ये 194 महिला चालकांचे प्रशिक्षण सुरू आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, नगर, धुळे, जळगाव, नाशिक, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, औरंगाबाद, जालना, परभणी, अकोला, यवतमाळ या विभागांचा समावेश आहे. पुणे विभागातील प्रशिक्षणार्थींची संख्या सर्वाधिक असून, त्याखालोखाल अमरावती येथे 22, नागपूर येथे 20, बुलढाणा येथे 17 जणींचे प्रशिक्षण सुरू आहे.
29 महिला बसचालकांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण ऑगस्ट महिन्यापासून सुरू झाले आहे. सध्या त्या ‘फिल्ड’वर प्रशिक्षण घेत आहेत.
– रमाकांत गायकवाड, विभाग नियंत्रक, पुणे विभाग
पुण्यात झाले होते कार्यक्रमाचे उद्घाटन
2019 मध्ये पुण्यात महिला चालकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन झाले होते. यावेळी आगामी काही वर्षांमध्ये सुमारे 1 हजार महिलांना एसटीच्या बसेस चालवण्याचे प्रशिक्षण देण्याची घोषणा महामंडळाने केली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे प्रशिक्षणाला ब्रेक लागला होता. आता अनलॉकनंतर प्रशिक्षण सुरू झाले आहे.