सारोळा (खेड शिवापूर) : राजगड पोलिसांनी पुणे-सातारा महामार्गावर खेडशिवापूर (ता. हवेली, जि. पुणे) टोलनाक्यावर गोव्याकडे ६ किलो चरस घेऊन चाललेल्या दोघांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांचे मुल्यांकन साडेतीन कोटी रुपये आहे. मुंबईवरून गोव्याला जात असताना खेडशिवापूर टोलनाक्यावर या तरुणांना पकडण्यात आले. (Hashish)
खेडशिवापूर येथून एक तरुण ड्रग्ज घेऊन जात असल्याची माहिती राजगड पोलिसांना मिळाली. चरस तस्करी आरोपी मुस्ताकीन हुनिया याला पोलीस असल्याचे लक्षात येताच त्याने पळण्याचा प्रयत्न केला, परंतु राजगडचे पोलीस निरिक्षक सचिन पाटील, सहाय्यक निरिक्षक मनोजकुमार नवसरे यांनी पाठलाग करून त्याला पकडले. राजगड पोलिसांनी सहा किलो चरसचे मुल्याकंन ३२ लाख दाखवले आहे.
Hashish : राजगड पोलिसांची सापळा रचून कारवाई
भोर उपविभागिय अधिकारी धंनजय पाटील , प्रभारी पोलिस निरीक्षक सचिन पाटील , सहाय्यक निरिक्षक मनोजकुमार नवसरे , उपनिरिक्षक निखील मुगदूम, श्रीकांत पाटील, हवालदार अजित माने, भागिरथ घुले, पी.एस. निकम, संतोष तोंडकर, सुधीर खडतरे, नाना मदते, युवराज धोंडे, चालक सुनिल डिंबळे, राजगड पोलीसांच्या पथकाने या परिसरात सापळा रचून मुस्ताकीन हुनिया याला पकडले.
नेपाळ, बिहारमार्गे मुंबईत ड्रग्ज पुरवठा
इतक्या मोठ्या प्रमाणात चरसचा साठा सापडल्याने पोलिसांनी या आरोपीची कसून चौकशी केली असता हा काही आंतरराष्ट्रीय तस्करांच्या संपर्कात असल्याचे समोर आले. त्या टोळीचा हा म्होरक्या असून, नेपाळमार्गे बिहार आणि तेथून मुंबईत ड्रग्ज आणत असल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.
बिहार पटना जवळील नेपाळच्या सीमेवरून हे चरस भारतात आणले जात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार तस्करांची साखळी शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. हे चरस पाकिस्तानातून आले असावे, असेही म्हटले जात आहे.