राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेला कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखाना यावर केंद्रीय आयकर विभागाने छापा टाकला आहे. यामुळे तालुक्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (It Raids Ambalika Sugers)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असणारे साखर कारखाने यावर केंद्रीय आयकर विभागाने आज छापे टाकले आहेत. कर्जत तालुक्यातील बारडगाव सुद्रिक परिसरामध्ये अजित पवार यांचा अंबालिका साखर कारखाना आहे, या कारखान्यावर देखील या पथकाने छापा टाकला आहे.
यामुळे तालुक्यातील ऊस उत्पादक व नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान हा छापा कशासाठी टाकण्यात आला याबाबत मात्र माहिती मिळू शकलेली नाही.
It Raids Ambalika Sugers : जरंडेश्वर कारखान्यावरही कारवाई…
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या जरंडेश्वर कारखाना भेटीनंतर अवघ्या चोवीस तासांत आयकर पथक जरंडेश्वर कारखान्यावर दाखल झाल्याने कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. जरंडेश्वर कारखान्यावर छापेमारी सुरू झाल्याने खळबळ उडाली आहे. जरंडेश्वर कारखाना भेटी दरम्यान किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंमत असेल तर कारखान्याचा खरा मालक जाहीर करावा असे ओपन चॅलेंज दिलं होतं.
त्यास २४ तास उलटले नाहीत तोच आयकर विभाग विभागाच्या चार गाड्या कारखान्यांवर तपासणीसाठी आल्याचे वृत्त तालुक्यात सर्वत्र पसरल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी तीन महिन्यांपूर्वी ईडीने महत्वपूर्ण निकाल दिला आणि कारखाना प्रशासनाला नोटीस बजावलेली होती.
दौंड साखर कारखान्यावरही चौकशीसाठी पथक
राज्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर छापेमारी सुरू असताना गुरुवारी सकाळी 6 वाजलेपासून आलेगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील दौंड शुगर या साखर कारखान्यावरतीही चौकशीसाठी पथक दाखल झाले आहे.
या पथकाने कारखान्याच्या मुख्य ऑफिसमध्ये चौकशी सुरू असून कारखान्यावर पोलीस व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांचा खडा पहारा असून आत व बाहेर एकाही व्यक्तीला जाण्यायेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. चौकशीसाठी आलेले पथक नेमकं ईडी, का आयकर विभाग आहे हे अद्याप समजलेलं नाही
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…
माझे नातेवाईक असल्याने धाड टाकल्याचे मला वाईट वाटत आहे. माझ्याशी सबंधितांवर छापा टाकला जातो याचा माझ्या नातेवाईकांना त्रास होत आहे. माझ्या नातेवाईकांनी सर्व आयकरचे नियम पाळले. राजकीय हेतुने धाड टाकली की कुठल्या हेतूने धाड टाकली याबाबत आयकर माहिती देईल, असे म्हणाले. मी दर्शनासाठी गेलो होते तेथून येताना छापा टाकल्याचे मला महिती मिळाली, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.