अकोला: दि.६: येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था अकोला येथे ‘टॅक्सीडर्मी-मृत्यूनंतरचे जीवन’ या विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेसहित जगभरातून विविध स्तरातून पशु प्रेमी लोकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला.
या वेबिनारचे उद्घाटन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे विस्तार संचालक प्रा. डॉ. अनिल भिकाने यांचे हस्ते झाले. प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचा जगण्याचा घटना दत्त हक्क सुरक्षित राहून त्यांच्यासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करण्यासाठी आणि मानव व प्राणी यांच्यातील परस्पर स्नेहपूर्ण नात्याचा उत्सव साजरा करण्याकरिता 4 आक्टोबर ला जागतिक प्राणी दिवस साजरा केला जातो.समाजात प्राण्याबद्दल कळवळा असून गोमातेला सर्वश्रेष्ठ मानलं गेलं आहे व त्याकरिता पशुवैद्यक पशुआरोग्य चांगले ठेवण्या करिता झटत असतो, असे प्रतिपादन डॉ. भिकाने यांनी केले.
देशातील नामांकित टॅक्सीडर्मी तज्ज्ञ प्रा.डॉ. संतोष गायकवाड मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय यांचे व्याख्यान यावेळी झाले. ते म्हणाले की, वाघ, सिंह, हत्ती, या प्राण्यांसोबत पक्षी व मासे यांचेही टॅक्सी-डर्मी द्वारे हुबेहूब बनविण्याचे तंत्र आहे. त्यांनीया बाबत मार्गदर्शन करतांना या कलेद्वारे तरुण लोकांना रोजगार उपलब्ध होतो, असे प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. चैतन्य पावशे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक डॉ प्रशांत कपले यांनी केली तर सूत्रसंचालन डॉ. कुलदीप देशपांडे यांनी आणि आभार प्रदर्शन डॉ. महेश इंगवले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता डॉ. मंगेश वडे, डॉ कुलदीप देशपांडे, डॉ महेश इंगवले व डॉ. दिलीप बदूकले यांनी अथक परिश्रम घेतले. वेबिनार समन्वयक म्हणून ॲलेंबिक फार्मा या औषध कंपनीचे डॉ. संतोष शिंदे, श्री पी. करुणानिथी यांनी कार्य पार पाडले.