‘लखीमपूर खेरी’च्या हिंसाचारावरुन शिवसेना पक्षाने योगी सरकारवर आणि भाजपवर निशाणा साधला आहे. “शेतकरी आंदोलन करीत असताना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने भरधाव गाडी शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसवून शेतकऱ्यांना ठार केले. त्यामुळे आंदोलक भडकले व हिंसाचार झाला. इतके मृत्यूकांड होऊनही देशातला मीडिया शाहरुख खानच्या मुलाने १३ ग्रॅम ड्रग्ज घेतल्यांच्या बातम्यांचा पाठलाग करीत आहे. उत्तर प्रदेशात मंत्रीपुत्राने चार शेतकरी चिरुडून मारले, त्यापेक्षा शाहरुख खानच्या पोराचे प्रताप या मंडळींना महत्वाचे वाटतात. शाहरुख खानचा मुलगा आणि त्याच्या नशेबाज मित्रमंडळींचे कृत्य हा श्रीमंतांचा माज आहे”, असं मत शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून मांडलं आहे.
शिवसेना काय म्हणते…
“हिंदुस्तान ज्या स्तंभांवर टिकून आहे ते स्तंभ भय आणि दहशतीच्या वाळवीने पोखरले गेले आहेत. रोजच देशात अशा घटना घडत आहेत व त्यामुळे लोकशाहीबाबतची चिंता वाढू लागते. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात आंदोलक शेकऱ्यांवर भरधाव गाडी घालून त्यांना चिरडून मारण्याचा निर्घृण प्रकार घडला आहे.”
“आपले प्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे कमालीचे संवेदनशील तसेच भावनाशील व्यक्तीमत्व आहे. त्यांना मानवता आणि गरीबांच्या हक्कांविषयी कळवळा आहे. त्यामुळेच अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जाहीरपणे अश्रू ढाळताना जगाने पाहिले आहे. त्या संवेदनशील मोदी यांनी चिरडून ठार केलेल्या शेतकऱ्यांविषयी संवेदना व्यक्त करू नयेत, याचे आश्चर्य वाटते. कुत्र्याचे पिल्लू गाडीखाली आले तर ते मरणारच, त्याविषयी किती दुःख व्यक्त करायचे.”
“शाहरुखच्या पुत्राच्या कृत्याचे ढोल बडविताना मीडियाने उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या निर्घृण हत्यांवर जणू पडदाच टाकण्याचा प्रयत्न केला. शेतकरी आंदोलनावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. अश्रुधूर, लाठ्या चालविल्या गेल्याय. हरियाणात गोळीबार करण्यात आला आणि तेही कमी पडले तेव्हा त्यांच्यावर भरधाव गाड्या चढवून चिरडून मारले. या बातमीची आग मीडियाच्या छोट्या पडद्यावर आणि वृत्तपत्रांच्या कागदावर पेटलेली दिसली नाही. उलट शेतकऱ्यांना दोष देण्याचे काम सुरू आहे.”
शेतकऱ्यांना मारायचे आणि राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करायची ही कसली लोकशाही? केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने केलेला अपराध दुसऱ्या एखाद्या राज्यात घडला असता तर भाजपने देश डोक्यावर घेतला असता. आता शेतकऱ्यांनाच गुन्हेगार, अराजकवादी ठरविण्यासाठी आटापिचा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हत्या, शेकऱ्यांचे रक्त यापेक्षा श्रीमंतांच्या पोरांची अंमली पदार्थ्यांची व्यसने आणि थेरं कुणाला महत्वाची वाटत असतील, ‘जय जवान, जय किसान’चे नारे कशासाठी द्यायचे? बंद करा ती थेरं!”, असा राग शिवसेना पक्षाने मुखपत्रातून व्यक्त केला आहे.