अकोला: दि.४ मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.१ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर राबविण्यात येत आहे. त्यात छायाचित्रासह मतदार यादीमध्ये छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे तपासणे व घरोघरी जाऊन मतदारांचे फोटो गोळा करणे हे कामकाम करण्यात आले. या मोहिमे अखेर जिल्ह्यात एकूण १५ लक्ष ६७ हजार ८०० मतदारांपैकी छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या ६८ हजार ८२६ इतकी होती. या मोहिमेत घरोघरी जाऊन ५ हजार ७०६ मतदारांची छायाचित्रे संग्रहित करण्यात आली, त्यानंतर ६३ हजार १२० मतदारांची नावे वगळण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.
मतदार संघ निहाय आकडेवारी या प्रमाणे-
२८-अकोट- एकूण मतदार २ लाख ९१ हजार ५५१, छायाचित्र नसलेले मतदार ७२६१, संग्रहित केलेले छायाचित्र १२३७, वगळणी केलेले मतदार संख्या ६०२४.
२९-बाळापूर- एकूण मतदार २ लाख ९४ हजार ८३२, छायाचित्र नसलेले मतदार ५१४७, संग्रहित केलेले छायाचित्र ३८८, वगळणी केलेले मतदार संख्या ४७५९.
३०-अकोला पश्चिम- एकूण मतदार ३ लाख ३२ हजार ७०१, छायाचित्र नसलेले मतदार २४२१४, संग्रहित केलेले छायाचित्र ८५६, वगळणी केलेले मतदार संख्या २४२१४.
३१-अकोला पूर्व- एकूण मतदार ३ लाख ४२ हजार ११०, छायाचित्र नसलेले मतदार १६२०७, संग्रहित केलेले छायाचित्र २५, वगळणी केलेले मतदार संख्या १६१८२.
३२-मुर्तिजापूर- एकूण मतदार ३ लाख ६ हजार ६०६, छायाचित्र नसलेले मतदार १५९९७, संग्रहित केलेले छायाचित्र ३२००, वगळणी केलेले मतदार संख्या १२७९७.
या पाचही मतदार संघात मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे तपासणे, घरोघरी जाऊन मतदारांचे फोटो गोळा करणे तसेच दिलेल्या पत्त्यावर वास्त्यव्यास नसलेल्या मतदारांची मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे करुन छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे वगळणे ही कार्यवाही करण्यात आली.
वगळणीची कार्यवाही पूर्ण होत असून वगळणी होत असलेल्या मतदारांची नावे https://akola.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेली आहे. छायाचित्र नसलेल्या मतदारांची तसेच वगळणी केलेल्या मतदारांची यादी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातही उपलब्ध आहे.
दि.१ नोव्हेंबर पासून दावे हरकती स्विकारणार
दरम्यान दि.१ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत राज्यातील तसेच अकोला जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर झालेला असून सोमवार दि.१ ते मंगळवार दि.३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावे वगळणे, इ. करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरुन द्यावे. मतदार यादीतील दुबार नावे, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळणे ही कार्यवाही सुद्धा याच मोहिमेत होणार आहे. जिल्ह्यातील पात्र मतदार नव मतदार यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव नोंदवावे. तसेच voter helpline app च्या सहाय्यानेही मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. याव्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे विहित नमुन्यात अर्ज भरुन ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदविता येईल. तरी मतदारांनी आपली नावे नोंदवावीत असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.