मुंबई: मुंबई जवळ शनिवारी रात्री भरसमुद्रात ‘कॉर्डेलिया द एम्प्रेस’ या आलिशान क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (Narcotics Control Bureau) छापा टाकून रेव्ह पार्टी उधळली आणि ८ जणांची धरपकड केली. या प्रकरणात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Arrested) याच्यासह तिघांना अटक करण्यात आली.
एनसीबीची ही कारवाई रविवारी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. या प्रकरणाशी संबंधित एनसीबीने मुंबईतील वांद्रे, अंधेरी आणि लोखंडवाला येथे छापेमारी केली. या कारवाईदरम्यान अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
मुंबईजवळ शनिवारी रात्री भरसमुद्रात क्रूझवर छापा टाकला होता. या कारवाईत एनसीबीने ८ जणांची धरपकड केली. या प्रकरणात शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan Arrested) याच्यासह तिघांना अटक केली होती.
या तिघांकडून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि एक लाख ३३ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) या कारवाईत मुनमुन धमीचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट आणि शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.
एनसीबीच्या अधिकार्यांनी आर्यन खानची तब्बल चार तास चौकशी केली. त्यानंतर अरबाज आणि मुनमुन धमीचा यांच्यासह आर्यन खानला पोलिसांनी अटक केली.
एनसीबीचे अधिकारी पर्यटक बनून ‘कॉर्डेलिया द एम्प्रेस’ जहाजावर गेले होते. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या पथकाचे नेतृत्व केले. जहाज खोल समुद्रात गेल्यावर रेव्ह पार्टी सुरू झाली. पार्टीत अमली पदार्थांचे सेवन सुरू झाल्याचे पाहिल्यावर एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई सुरू केल्याचे सांगण्यात आले.