अकोल्यात पोलिसांच्या खाकीला एका पोलीस शिपायाने बदनाम केल्याची घटना घडली असून एक पोलिस आणि त्याचे तिघे सहकारी यांच्या संगनमताने गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अकोल्यापासून काही अंतरावर असलेल्या रिधोरा येथे बस थांबवून त्यातील एकाला लुटले. ५० लाखांची रोकड घेऊन तिघेही पसार झाले. मात्र स्थानिक गुन्हे शाखेने रातोरात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या तिघांसह लक्झरी बसच्या व्यवस्थापकाला पोलिसांनी अटक केली.
या दरोड्यात रामविलास उर्फ राम गोविंद पवार (वय ३३ रा. धाबेकर नगर खडकी) हा पोलिस कर्मचारी असून तो काही दिवसांपासून तो रजेवर आहे. त्याने यशपाल मदनलाल जाधव (वय २८ रा. कमला नेहरू नगर), तनवीर खाॅ उर्फ सोनू जहॉगिर खाॅ (वय २५ रा. गंगा नगर वाशिम बायपास) आणि व्यवस्थापक अमित उर्फ पिंकू प्रेमशंकर मिश्रा वय २८ रा. संतोष नगर खडकी यांच्या मदतीने दरोडा टाकला.
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास ईश्वरदास भेराराम देवाशी वय २०. रा. माटुडा बोळी जि. बाडमेर राजस्थान ह.मु. बालाजी रेल्वे स्टेशन रोड अकोला हा ५० लाख रुपये घेऊन रामलता येथील लक्झरी स्टॅण्डवर पोहचला असता तेथून तो राणा ट्रॅव्हल्स मध्ये बसला आणि मुंबईसाठी निघाला होता. लक्झरी बस रिधोऱ्याच्या समोर थांबली असता बसमध्ये एक आरोपी घुसला. इश्वरदास कोण है असे म्हणून त्याने इश्वरदासला खाली खेचले. खाली उभे होतेच. त्या तिघांनीही ईश्वरदासला मारहाण केली आणि त्याच्याजवळील पैशाची बॅग हिसकावून पळून गेले.
घटना घडल्यानंतर बाळापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने ईश्वरदास रेल्वेस्थानक परिसरातून रामलताकडे जाण्यासाठी ज्या ज्या मार्गाने गेला. त्या त्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. रामलता येथीलही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. त्याचप्रमाणे लक्झरी बस ज्या मार्गाने गेली त्या मार्गावरीलही तपासले. त्यामध्ये पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर आरोपी यशपाल हा बॅग घेवून जाताना दिसला. पोलिसांनी आधी यशपालला ताब्यात घेतले नंतर तिघांना. आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पोलिस कर्मचारी रामविलास पवार हा आधीच वादग्रस्त आहे.
ईश्वरदास याला पोलिसांनी ५० लाख रुपयांच्या रकमेबाबत काहीही सांगत नसल्याने सदर रक्कम हवाल्याची असल्याचा संशय आहे. हवाल्याची रक्कम असल्यानेच आरोपींनी दरोड्याचा प्लॅन बनवला. कारण रक्कम लुटली तरी ईश्वरदास हा पोलिसात तक्रार करणार नाही, असे आरोपींना वाटले असावे, त्यामुळे त्यांनी लुटमार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या कटात लक्झरी व्यवस्थापक असल्याने त्यानेच आरोपींना माहिती दिली आणि रात्री आठ वाजता बस रस्त्यात थांबली.
अकोला स्थानिक गुन्हे शाखेने रातोरात आरोपींना बेड्या ठोकल्या. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले व त्यांचे पथकातील सहायक पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, पीएसआय गोपाल जाधव, गोपिलाल मावळे, दशरथ बोरकर, संदीप काटकर, फिरोज खान, गोकुळ चव्हाण, शक्ती कांबळे, विरेंद्र लाड, स्वप्नील खेडकर यांनी केली.