अकोला: दि.2: जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघात मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी मतदार नोंदणी, नाव दुरूस्ती, नाव वगळणे आदी सुविधा ऑनलाईन व वोटर हेल्पनलाईन ॲपव्दारे घरबसल्या करता येणार आहे. तरी नागरिकांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.
पुर्व पुर्ननिरीक्षण उपक्रमामध्ये दुबार अथवा समान नोंदणी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी करणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, योग्यप्रकारे विभाग / भाग तयार करणे आदी बाबी 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत राबविण्यात येत आहे. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर दावे व हरकती दि. 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे. दावे व हरकती 20 डिसेंबर 2021 पूर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे.
दर्शविलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील नागरीकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नाव वगळणे इत्यादीकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे आवश्यक फॉर्म भरुन देण्यात यावे. तसेच मतदार यादीतील दुबार, स्थलांतरित, मयत मतदारांची नावे वगळण्याची कार्यवाहीसुध्दा यामोहिमेत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नव व पात्र मतदार यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा voter helpline app या ॲपच्या मदतीने मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. या व्यक्तीरिक्त ज्या मतदारांना ऑफलाईन पद्धतीने आपले नाव नोंदवावयाचे असेल त्यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज भरुन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेमार्फत मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी निमा अरोरा यांनी केले.