अकोला: दि.१: केंद्रीय वित्त मंत्रालयाने पत पोहोच प्रचार मोहिम (Credit Outreach Campaign) राबविण्याचे निर्देश दिले असून या मोहिमेद्वारे सर्वसामान्य नागरिकांना विविध पत योजना तसेच कर्ज योजना याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. त्यासाठी दि.७ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्व बॅंका व वित्तीय संस्थांनी आपापल्या संस्थेमार्फत उपलब्ध असलेल्या अर्थसहाय्य, कर्ज योजना याबाबत माहिती द्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज दिले.
या संदर्भात आज सर्व बॅंकांचे अधिकारी, व्यवस्थापक यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस बॅंक ऑफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर अभिजीत चंदा, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शरद वाळके, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तेरानिया तसेच सर्व बॅंकांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बॅंकांनी आपापल्या क्षेत्रातील तसेच विविध शासकीय योजना तसेच विभागांमार्फत जे अर्थसहाय्य दिले जाते त्याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. त्यात केंद्राच्या विविध योजना, कृषी, पशुसंगोपन, दुग्ध व्यवसाय, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजना इ. सारख्या योजनांमध्ये उदयोन्मुख उद्योजक, व्यावसायिक इ. घटकांना अर्थसहाय्याबाबत तसेच कर्ज पुरवठ्याबाबत माहिती देणे अपेक्षित आहे. त्यासाठी दि.७ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन भवनात संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. त्यात सर्व बॅंका व वित्तीय संस्थांनी आपापल्या योजनांची माहिती द्यावी. या आधी कर्ज घेतलेल्या यशस्वी व्यावसायिकांची यशकथा प्रत्यक्ष सांगावी,असे सांगण्यात आले.