पिंपळनेर : nashik murder : माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना तालुक्यातील कुडाशी पैकी अंबापाडा येथे घडली. दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पोटच्या मुलानेच जन्मदात्या आईला बेदम मारहाण करत भिंतीवर डोके आपटत तिचा क्रुरपणे खून केला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी खुनी मुलास अटक केली आहे.
गुलाब बंडु बागुल (रा.कुडाशीपैकी अंबापाडा ता.साक्री) असे आरोपीचे नाव आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे. काल रात्री आठ वाजेपुर्वी त्याने आई सुमनबाई बंडू बागुल (वय ६०) हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र सुमनबाई यांनी त्याची समजुत काढत त्याला पैसे देण्यास नकार दिला.
त्याचा राग येवून गुलाबने आईस हाताबुक्यांनी बेदम मारहाण केली. तसेच तिचे डोके घरातील भिंतीवर व फरशीवर आपटून तिच्या डोक्याला गंभीर दुखापत करून तिचा खून nashik murder केला. त्याबाबत गावातील चुनीलाल तानाजी बागुल (वय ५५) हे त्याला समजविण्यास गेले असता त्याने त्यांना देखील हाताबुक्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदिप मराठे, पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सपोनि एस.एस.साळुखे यांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला ताब्यात घेतले. याप्रकरणी चुनीलाल बागुल यांनी पिंपळनेर पोलिसात फिर्याद दिली. घटनेमुळे गावात संताप व हळहळ व्यक्त होत आहे.