कोल्हापूर: कोरोना काळात गरजूंना मोफत उपलब्ध करून देण्यात येणारी शिवभोजन थाळी आता बंद होणार आहे. 1 ऑक्टोबरपासून या थाळीसाठी पुन्हा 10 रुपये मोजावे लागणार आहेत. कोरोनाची स्थिती सुधारत असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. थाळ्यांची दीडपट मर्यादाही पूर्ववत केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सहा हजार थाळ्यांऐवजी दररोज चार हजार थाळ्याच उपलब्ध होणार आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत 15 एप्रिलपासून ही थाळी मोफत देण्याचा निर्णय झाला. गेले साडेेपाच महिने या थाळींचे मोफत वितरण सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने मोफत थाळी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवभोजन केंद्रांवर थाळ्यांची दीडपट केलेली मर्यादा पूर्ववत केली जाणार आहे. या थाळ्या पार्सल दिल्या जात होत्या, आता ही सुविधासुद्धा बंद केली
आहे.
जिल्ह्यात 41 शिवभोजन केंद्रे आहेत. त्याद्वारे 15 एप्रिल 2021 पासून 28 सप्टेंबर2021 पर्यंत 9 लाख 24 हजार 201 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे. 1 ऑक्टोबरपासून 10 रुपये देऊन या थाळ्या घ्याव्या लागणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात 26 जानेवारी 2020 पासून 16 सप्टेंबर 2021 या कालावधीत 21 लाख 44 हजार 79 थाळ्यांचे वितरण झाले आहे.