गोंदेगाव : नाशिक पाऊस: निफाड पूर्व भागातील गावांमध्ये काल मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झाले. गोई नदीच्या उगमस्थानापासून पाऊस बरसत आहे. त्यामुळे गोई नदीने रुद्ररुप धारण केलेले आहे. दरम्यान, पावसामुळे दीडशे क्विंटल कांद्यासह गहू भिजला आहे. भरवस येथील लेंडी नाल्याने पातळी ओलांडली. त्यामुळे नवनाथ चौधरी या शेतकऱ्याच्या घरात पुराचे पाणी शिरले. (नाशिक पाऊस) येथील पंचवीस क्विंटल गहू, रासायनिक खते, आणि दीडशे क्विंटल कांदे भिजले.
साठविलेल्या ठिकाणी या पाण्याने अंदाजे चार लाख रुपयांचे प्राथमिक नुकसान झाले आहे. पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की चाळीतील कांदे वाहून गेले. चौधरी यांनी प्रसंगवधान राखत जनावरे सोडून दिली. कुटुंबासह सुरक्षित आसरा शोधला. महसूल विभागाने पंचनामे करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून समुहातील धरण भरल्याने त्यातून विसर्ग वाढला आहे. चणकापूर व पुनद धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला आहे. या हंगामातील गिरणा नदीचा सर्वात मोठा पूर ठरणार आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
२४२७ दलघफू क्षमतेच्या चणकापूर धरणात ९७ टक्के, तर १३०६ दलघफू क्षमतेच्या पूनद धरणात ९८ टक्के जलसाठा मर्यादित करुन मंगळवारी रात्री ११ वाजता अनुक्रमे ८८८८ व ३८०० क्यूसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला.
या भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने ठेंगोडा बंधाऱ्यावरुन सुमारे १२ हजार क्यूसेक इतका फ्लो राहण्याची शक्यता आहे. बुधवारी पहाटे २ वाजता ही परिस्थिती असेल. तेथून मालेगावातील गिरणा पुलापर्यंत हे पुराचे पाणी पहाटे पाच वाजेपर्यंत येणार आहे. त्यामुळे नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा तहसीलदार सी आर राजपूत यांनी दिला आहे.