बारामती: प्रेमविवाह केल्याच्या वादातून तरुणाला मारहण करत त्याच्या पत्नीचे जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण केल्याची घटना बारामतीत घडली. संबंधित महिलेच्या चुलत भावाने आपल्या काही साथीदारांसह हे कृत्य केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोघा अनोळखींसह सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रशांत दादासाहेब गायकवाड, गोपीनाथ भाऊसाहेब गायकवाड (दोघे रा. बाभुळगाव दुमाला, ता. कर्जत, जि. नगर), पप्पू कवडे व राहुल खरात (दोघे रा. कात्रज, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह दोघा अनोळखींचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
विठ्ठल हनुमंत माळवदकर (मूळ रा. बाभुळगाव दुमाला, सध्या रा. बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली.
रविवारी (दि. २६) येथील मोतानगरशेजारी ही घटना घडली. फिर्यादी माळवदकर याने सज्ञान असलेल्या नात्यातीलच महिलेशी पळून जावून प्रेमविवाह केला. या विवाहाला तिच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे पळून जात त्यांनी रजिस्टर लग्न केले.
त्यानंतर हे दोघे बारामतीत एका भाडोत्री घरामध्ये राहत होते. रविवारी (दि. २६) ते खरेदीसाठी बाहेर पडले. यावेळी दोन मोटारीतून सहाजण आले. त्यात फिर्यादी माळवदकर यांच्या पत्नीचा चुलतभाऊ प्रशांत, गोपीनाथ व त्यांचे मित्र होते.
त्यांनी प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून माळवदकर यांना हाॅकीस्टीकने, हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माळवदकर याला पकडून ठेवत एका मोटारीत त्यांच्या पत्नीला मारहाण करत जबरदस्तीने मोटारीत बसण्यास भाग पाडत तिचे अपहरण करण्यात आले.
त्यानंतर पुन्हा फिर्यादी माळवदकर याला मारहाण करत तिघे दुसऱ्या गाडीतून निघून गेले. घटनेनंतर फिर्यादी माळवदकर याने तालुका पोलिस ठाणे गाठले. औषधोपचार केल्यानंतर याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली.