Pradhan Mantri Digital Health Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन (PM-DHM) योजनेचा शुभारंभ करणार आहेत. याआधी ही योजना राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन (एनडीएचएम) च्या नावाने सुरु होती. राष्ट्रीय डिजिटल आरोग्य अभियानाच्या प्रायोगिक प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट, 2020 रोजी लाल किल्ल्यावरुन केली होती. सध्या, सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम-डीएचएम प्रायोगिक टप्प्यात सुरु होणार आहे. पीएम-डीएचएम डेटा, माहिती आणि पायाभूत सेवांच्या विस्तृत श्रेणीच्या माध्यमातून सुलभ, सर्वसमावेशक, कार्यक्षम, परवडणारे आणि सुरक्षित पद्धतीने आरोग्य सुविधा प्रदान करते.
या योजनेअंतर्गत, नागरिकांना आधार प्रमाणे एक डिजीटल हेल्थ आयडी पुरविली जाईल. या आयडीमध्ये त्या व्यक्तीच्या आरोग्यसंदर्भातील सगळे रेकॉर्ड्स उपलब्ध असतील. हा हेल्थ आयडी प्रत्येक नागरिकासाठी एकमेव असा असेल. आधार कार्ड आणि मोबाईल नंबरच्या आधारावर त्याची निर्मिती करण्यात येईल. प्रधानमंत्री डिजीटल हेल्थ मिशनचा उद्देश भारताची आरोग्य सेवा प्रणाली अधिक चांगली करणे हा आहे. याद्वारे हेल्थकेअरच्या गरजांसाठी एकाच छताखाली सर्व सुविधा मिळणे शक्य होईल. तसेच अशा सेवा देणाऱ्या संस्थांपर्यंत पोहोचणे देखील सोपे होणार आहे. हेल्थकेअर प्रोफेशनल्स रजिस्ट्री (एचपीआर) आणि हेल्थकेअर फॅसिलिटीज रजिस्ट्रीज (एचएफआर) हे आधुनिक आणि पारंपारिक औषध पद्धतीच्या सर्व आरोग्य सेवा प्रदात्यांचे केंद्र म्हणून काम करतील. यामुळे डॉक्टर/रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी व्यवसाय करणे सुलभ होईल.
प्रधानमंत्री डिजीटल हेल्थ मिशन केंद्र सरकारची एक पायलट प्रोजेक्ट योजना आहे. ही योजना सध्यातरी पायलट प्रोजेक्ट पद्धतीने राबवली जात आहे. याअंतर्गत केंद्र शासित प्रदेश अंदमान-निकोबार द्वीप समूह, चंदीगढ, दादरा आणि नगर हवेली आणि दमन-दीव, लडाख, लक्षद्वीप आणि पुदुच्चेरीमध्ये ही योजना राबवली जाणार आहे.