मुंबई : वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांना ई-चलानच्या माध्यमातून ठोठावण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा दंड थकलेला असून, त्याच्या वसुलीसाठी लोकअदालत घेण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे दहा लाख वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत.
नियमभंग करणाऱ्या चालकांवर कारवाईसाठी ऑक्टोबर २०१६ मध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाने ई-चलान प्रणाली सुरू केली होती. त्यानंतर राज्याच्या बहुतांश जिल्ह्यांत ही प्रणाली सुरू करण्यात आली. वेगमर्यादा तपासणारे कॅमेरे राज्यभर बसविण्यात आले. पोलिसांना पावती पुस्तकांऐवजी चलान मशिन्स देण्यात आल्या. दंडाची रक्कम वाढली तरी वसुली मात्र होताना दिसत नाही. वसुलीसाठी आता २५ सप्टेंबरपासून लोकअदालत सुरू करण्यात येणार आहे.
रक्कम तत्काळ भरावी
ही लोकअदालत तीन दिवस चालणार आहे. यात प्रामुख्याने प्रकरणे मिटविण्यावर भर दिला जाणार आहे. ज्यांना नोटिसा मिळालेल्या नाहीत, त्यांनी वाहतूक पोलिसांच्या ॲपवर जाऊन थकीत रक्कम तपासून घ्यावी तसेच पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी ही रक्कम तात्काळ भरावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांच्या वतीने करण्यात आले.