पुणे: मेट्रो प्रवासामुळे वेळ, पैशांची बचत होऊ शकते. त्यामुळे एसटीच्या तिकिट दरात पुणे ते कोल्हापूर मेट्रो प्रवास शक्य आहे. पुढील काळात हा मेट्रो मार्ग होऊ शकेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
ते पुणे येथे उड्डाण पुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, आपल्याला पर्यावरण रक्षणासाठी मेट्रो हाच आपल्याकडे पर्याय आहे. त्यामुळे पुण्याला जोडणारी शहरे मेट्रोच्या जाळ्याने जोडली पाहिजेत,
यासाठी पुणे ते कोल्हापूर, कोल्हापूर ते अहमदनगर आणि सोलापूर, बारामतीला जोडण्याचा मानस आहे. सध्या पुणे-बेंगलोर कॉरिडॉरसाठी नवा महामार्ग बनविण्याची तयारी सुरू आहे.
त्यासाठी ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. या महामार्गांशेजारी नवी शहरे वसवायची आणि ती मेट्रोने जोडायची असे नियोजन हवे.
वेळ आणि पैसा वाचवायचा असेल तर मेट्रोच्या विस्ताराशिवाय पर्याय नाही. पुणे हे मध्यवर्ती ठिकाण म्हणून पाहिले तर पुणे ते कोल्हापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते बारामती आणि पुणे ते सोलापूर असे मेट्रो मार्ग उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.
हा प्रवास एसटीच्या तिकिट दरात शक्य आहे. ही मेट्रो प्रतितास १४० किलोमीटर वेगाने धावू शकते. त्यामुळे आधी मेट्रोवर टीका होत होती, आता मात्र मेट्रोची उपयुक्तता लक्षात येत आहे. मेट्रोमुळे प्रदूषणाचा प्रश्न मार्गी निघेल.
ही मेट्रो सुरू झाली तर आठ डब्याच्या मेट्रोला दोन मालवाहतूक डबे असतील. त्यासाठी प्रयत्पन करण्याची गरज आहे. रेल्वेमंत्रालय जरी माझ्याकडे नसले तरी महाराष्ट्रासाठी मी हवे ते प्रयत्न करायला तयार आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामांचा आढावा घेतला.