अकोला : महिला प्रवाश्याच्या सुरक्षेकरिता, ऑटोवर पोलिस हेल्पलाईन क्रमांक आणि ऑटोमध्ये चालकाचा फोटो किंवा मालकाचा फोटो यासोबतच मोबाईल नंबर लिहणे शहर वाहतूक शाखेने अनिवार्य केले आहे. यामुळे महिलांबाबतीत होणाऱ्या अनुचित घटनांना रोखण्यासाठी शहर वाहतूक शाखेने ही नामी शक्कल लढविली आहे. ज्या चालकांकडे पोलिस हेल्पलाईन नंबर नसतील, त्यांना पोलिसांकडूनच नंबर देण्यात येणार आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या संकल्पने मधून देशात महिला, अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अनुचित घटनांना रोखण्यासाठी पोलिसांकडून नानाविध उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाला चांगली आणि महत्वाची जोड देण्यासाठी शहर वाहतूक शाखेने एक नवे पाऊल टाकले आहे.
या उपक्रमातून संशयितांना पकडण्यास पोलिसांना नक्कीच मदत होईल, असा आशावाद पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, खासगी प्रवासी वाहतुकीमधूनच महिलांना टार्गेट केलं जात असल्याचे, तपासमधून समोर आले आहे. याच खासगी वाहतुकीला सामोरे ठेवत शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी ऑटो, खासगी प्रवासी वाहतूक या वाहनांवर पोलिस हेल्पलाईन, दामिनी पथक हेल्पलाईन, पोलिस कंट्रोल रूमचे नंबरचे स्टिकर तयार करून, ते प्रत्येक ऑटो आणि खासगी प्रवाशी वाहतुकीच्या वाहनांवर लावण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक ऑटो, खासगी प्रवासी वाहनांवर वाहन मालक किंवा चालकाचा फोटो आणि त्यांचा मोबाईल नंबर प्रवाशाला दिसेल अशा दर्शनी भागात लावण्यास बंधनकारक करण्यात आले आहे.
पोलिसांचा प्रयोग ठरणार फायदेशीर – पोलिस अधीक्षक
या हेल्पलाईन क्रमांकावरून महिलांना ऑटो, खासगी प्रवाशी वाहन यांची ओळख पटविणे, तसेच चालकाचा चेहरा आणि मोबाईल नंबरही वाहनात बसल्यानंतर नोंद करता येणार आहे. पोलिसांचा हा प्रयोग एका नव्या क्रांतीला निर्माण करणारा ठरू शकतो, असा आशावाद पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी व्यक्त केला आहे.अशी राहणार स्टिकर्सवर माहिती
शहर वाहतूक शाखेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला, स्टिकरमध्ये ऑटो चालकाचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर तसेच ऑटो क्रमांक लिहिले, असून अकोला पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 100, पोलीस मदत क्रमांक 112, पोलीस नियंत्रण कक्ष क्रमांक 0724- 2435500 या क्रमांकाची नोंद करण्यात आली आहे.
जर एखाद्या महिला किव्हा युवतीला ऑटो मध्ये प्रवास करतांना कोणताही त्रास झाला, तर त्यांनी ऑटोमध्ये दिलेल्या क्रमांकावर त्वरित फोन केल्यास त्यांना पोलीस विभागाकडून त्वरित मदत मिळण्यास मदत होणार आहे, अशी माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विलास पाटील यांनी दिली आहे.