नगरच्या संगमनेरमधल्या बस स्थानकात एका एसटी चालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच गळफास घेऊन या एसटी चालकाने आपले जीवन संपविले आहे. कर्जबारीपणाला कंटाळल्याने एसटी चालक सुभाष तेलोरे यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. संगमनेरच्या एसटी बस डेपोमध्ये २० सप्टेंबर २०२१ रोजी ही घटना घडली आहे.
काही महिन्यापूर्वी धुळे जिल्ह्यातही एका एसटी चालकाने आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतानाच आत संगमनेरमध्ये एसटी बसमध्येच चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पाथर्डीहून- नाशिकला जाणारी एसटी बस सोमवारी (२० सप्टेंबर) संगमनेरला आल्यानंतर डिझेल भरण्यासाठी थांबली होती. मात्र संगमनेर बसस्थानकात डिझेल उपलब्ध नसल्यामुळे या एसटी बसला संगमनेर बसस्थानकातचं मुक्काम करावा लागला. यावेळी बसमधील चालक आणि वाहकाने रात्र बसमध्येच काढली. सकाळी दोघेही फ्रेश होण्यासाठी उठले. यावेळी प्रथम वाहक फ्रेश होण्यासाठी गेले असताना बस चालक सुभाष तेलोरे बसमध्ये एकटेच होते. याचदरम्यान त्यांनी बसमध्येच कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतला.
यावेळी वाहक फ्रेश होऊन बसमध्ये परतले असता त्यांना चालक सुभाष तेलोरे बसमध्ये गळफास घेत लटकलेल्या अवस्थेत आढळले. एसटी चालक सुभाष तेलोरे हे कोल्हार तालुक्यातील पाथर्डी येथील निवासी असून ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. डोक्यावर वाढलेले कर्ज आणि एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर न मिळणारे पगार यामुळे ही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणाचा पोलिसांकडून तसाप सुरु असून सुभाष यांनी आत्महत्येपूर्वी काही सुसाईट नोट लिहिली आहे का याचा माहिती घेत आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळ कोट्यवधी रुपयांच्या तोट्यात आहे. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नव्हते. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा वेतनाचा मुद्दा अतिशय गंभीर रुप धारण करत आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी पगार वेळेवर न मिळाल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.