वरुड (अमरावती) : ऋषाली अन् अतुल…ती १९ वर्षांची तर तो २५ वर्षांचा…२२ ऑगस्टला लग्नगाठ बांधली अन् संसार सुरू झाला. २१ दिवसांच्या गोडी-गुलाबीच्या संसारात भावी आयुष्याचे स्वप्न रंगविले. पण, नियतीच्या मनात काय होतं कोणास ठाऊक? वर्धा नदीत नाव (wardha river incident) उलटली अन् अंगाची हळद निघाली नसतानाही दोघांच्याही संसाराचा शेवट झाला.
वरुड जिल्ह्यातील गाडेगाव येथील ऋषालीचे वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) येथील अतुल वाघमारे याच्यासोबत लग्न जुळले. गेल्या २२ ऑगस्टला हसत-हसत लग्नगाठ बांधली. पण, ऋषालीच्या माहेरच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला. गाडेगाव येथे १४ सप्टेंबरला त्यांचा दशक्रियेचा कार्यक्रम होता. त्यासाठी ऋषाली पतीसोबत माहेरी गेली. त्यानंतर मंगळवारी सकाळी आपल्या नातेवाईकांसोबत वर्धा नदीत राख शिरवायला नावेत बसून गेली. राख शिरविली अन् परत येताना नदीनं रौद्र रुप धारण केलं. त्यातच नाव अनियंत्रित झाली अन् ऋषालीसह तिचे ११ नातेवाईकही बुडाले. ऋषाली आणि अतुलचा २१ दिवसांचा संसार वर्धा नदीत बुडाला, तो पुन्हा न सावरण्यासाठीच. कारण, दोघांनीही नदीच्या पाण्यातच जीव सोडला होता. तब्बल ४८ तासांच्या प्रयत्नानंतर दोघांचेही मृतदेह सापडले. त्यानंतर नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.
एकाच सरणावर निरोप :
अवघ्या २१ दिवसांचा संसाराचं सुख पाहिलेलं नवदाम्पत्य असं अचानक वर्धी नदीनं गिळलंय. दोघांचेही मृतदेह गावात येताच सर्वांनी टाहो फोडला. आयुष्य जगण्यापूर्वीच दोघांनाही एकाच सरणात निरोप द्यावा लागला. हे दृश्य पाहून अनेकांच्या हृदयाचे ठोके चुकले. अख्खं गाव धाय मोकलून रडत होतं