मुंबई : अनंत चतुर्दशीदिनी गणपती विसर्जनादरम्यान वर्सोवा येथील समुद्रात गणेश विसर्जनासाठी उतरलेली पाच मुलं बुडाली होती. यांपैकी दोन जणांचा वाचवण्यात काल यश आलं होतं. पण तिघे जण बेपत्ताच होते. या तिघांपैकी दोन जणांचे मृतदेह सोमवारी अग्निशमन दलाला मिळाले आहेत. तर एकजण अद्यापही बेपत्ताच आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.
पोलिसांच्या हवाल्याने एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी अनंत चतुर्दशीदिनी गणपती विसर्जनसाठी वर्सोवा येथील समुद्रात उतरलेली पाच मुलं बुडाल्याची खबर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली. दरम्यान, तातडीनं बचाव मोहिम राबवल्यानं दोन जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आलं. रात्री अंधार झाल्यानं बोटीनं बचाव कार्यात अडथळे येत असल्यानं मोहिम थांबवण्यात आली. त्यानंतर आज (सोमवारी) तिघांपैकी दोघांचे मृतदेह अग्निशमन दलाला मिळाले. पण अद्यापही एकजण बेपत्ताच आहे.
समुद्रात गणेश विसर्जनाला बंदी असतानाही काही स्थानिक लोक वर्सोवा बीचवर रविवारी विसर्जनासाठी आले होते. त्यानंतर बचावकार्य सुरु असताना डॉक्टरांसह आमचं पथक बचावकार्यात दाखल झालं होतं. दरम्यान, दोन जणांना वाचवण्यात यश आलं त्यानंतर त्यांना प्रथमोपचार देण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच उर्वरित तीन जणांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती काल पोलीस नाईक मनोज पोहणेकर यांनी दिली होती.