पुणे : गणेशोत्सव काळात पुण्यात जमावबंदी किंवा संचारबंदी लागू करण्यात आली नव्हती. मात्र, अनंत चतुर्दशीला म्हणजे गणपती विसर्जनादिवशी पुण्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. अनंत चतुर्दशीला पुण्यात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु ठेवण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हा अजित पवार आणि पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुण्यात गणपती विसर्जना दिवशी निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना परिस्थितीबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गणेश विसर्जनाला पुणेकर मोठ्या संख्येनं घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात सर्व दुकाने बंद करुन निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.