हिवरखेड(धीरज बजाज)- हिवरखेड येथील सरपंचाच्या परवानगीने वेळेवर येणाऱ्या विषयात हिवरखेड गावाची फाळणी करून दोन ग्रामपंचायत कराव्या पण नगरपंचायत करू नये असा ठराव ज्या ग्रामसभेत घेतल्याचे दाखविल्या गेले. ती 21 ऑगस्ट रोजीची ग्रामसभाच गैरकायदेशीर असल्याने ती ग्रामसभाच रद्द ठरविण्यात यावी अशी सविस्तर तक्रार ग्रा. पं. सदस्य सुनिल इंगले यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह अनेक वरिष्ठांकडे लिखित स्वरूपात केली होती. त्याची दखल घेत.
त्या वादग्रस्त आणि गैरकायदेशीर ग्रामसभेची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी गटविकास अधिकारी तेल्हारा यांना दिले होते. त्या आदेशानुसार गटविकास अधिकारी तेल्हारा यांनी सतिष सरोदे, विस्तार अधिकारी पंचायत यांना त्या गैरकायदेशीर ग्रामसभेची तात्काळ चौकशी करावी आणि या कामाला प्राधान्य देण्यात यावे व अहवाल सादर करण्यास विलंब होऊ नये ह्याची दक्षता घेण्याचे स्पष्टपणे आदेश दिले होते. परंतु अनेक दिवस उलटूनही त्या गैरकायदेशीर ग्रामसभेची चौकशी होत नसल्याने या चौकशीचे काय झाले? याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. सदर चौकशी राजकीय दबावाखाली होत नसल्याचा आरोप तक्रारकर्ते सुनील इंगळे यांनी केला आहे. याप्रकरणी विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी, इत्यादी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही.
प्रतिक्रिया:-
त्या गैरकायदेशीर ग्रामसभेची तात्काळ चौकशी करण्याचे वरिष्ठांचे स्पष्ट आदेश असतानाही अद्याप चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे राजकीय दबावाखाली संबंधित अधिकारी चौकशी करण्यास धजावत नसल्याचे दिसत आहे.
सुनिल इंगळे ग्रा.पं. सदस्य हिवरखेड.