ठाणे : एका लिंकवर ट्रेडिंगद्वारे जादा परताव्याचे अमिष दाखवून नऊ लाखांची गुंतवणूक करण्यास भाग पाडून सचिन गायकवाड (४१, रा. कोपरी, ठाणे) यांची तब्बल नऊ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात अनोळखी भामटयाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा रविवारी दाखल झाला आहे.
कोपरीतील कांचनगंगा सोसायटीतील रहिवाशी गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर एका भामटयाने संपर्क साधला होता. त्याने त्यांच्या व्हॉटसअॅपवर एक लिंक पाठवून त्यावर ट्रेडिंग करुन मोठया रकमेचा परतावा मिळेल, असे अमिष दाखविले. त्यातूनच त्याने त्यांचा विश्वास संपादन करुन ३१ मे ते १८ जून २०२१ या कालावधीत त्यांना नऊ लाखांची गुंतवणूक करायला भाग पाडले. त्याने संगणकीय तंत्राचा वापर करुन त्यांची ही नऊ लाखांची रक्कम त्यांच्या बँक खात्यातून आॅनलाईनद्वारे काढून त्यांची फसवणूक केली. त्यानंतर वारंवार संपर्क करुनही त्याने त्यांना कोणत्याही प्रकारे प्रतिसाद दिला नाही. त्यांचे पैसेही परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गायकवाड यांनी याप्रकरणी अखेर कोपरी पोलीस ठाण्यात फसवणूक तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा ६६ ड नुसार गुन्हा दाखल केला आहे.