पिंपरी: डिलक्स चौकातील ‘तो’ थरार सीसीटीव्हीत कैद : पैशांची मागणी करीत तीन अल्पवयीन मुलांनी दुकानचालकावर धारधार शस्त्राने वार केले. तसेच दुकानातील साहित्याची तोडफोड केली. पिंपरीतील डिलक्स चौकातील कपड्याच्या दुकानात भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
कासिम अस्लम शेख (२६, रा. पिंपरी) यांनी मंगळवारी (दि. १४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे ‘मिस्टर मॅड’ या कपड्यांच्या दुकानात काम करीत होते. त्यावेळी आरोपी दुकानात आले. आम्हाला पैसे द्या, नाहीतर येथे धंदा करू देणार नाही, असा दम देत आरोपींनी फिर्यादी यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. तसेच, दुकानातील साहित्याची तोडफोड करून नुकसान केले.
कायम वर्दळ असलेल्या डिलक्स चौकात भरदिवसा हा प्रकार घडल्याने व्यापारी दहशतीखाली आले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.