पुणे : आजपर्यंत गणपती बाप्पांची मिरवणूक ढोल-ताशांच्या गजरात आणि बाप्पांच्या जयघोषात निघाल्याचे पाहिले असेल. परंतु, पुण्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक उत्सवाला आधुनिकतेची जोड देऊन बाप्पांची मिरवणूक ड्रोनवरून काढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे बाप्पांची चक्क ड्रोनवर आरूढ होऊन हवाई सफर करत प्रतिष्ठापना झाल्याचे दिसून आले. बाप्पांची मिरवणूक ड्रोनवरून पाहणे भाविकांसाठी पर्वणीच ठरली.
पुण्याच्या हडपसर येथे जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या तिसर्या आणि चौथ्या वर्षात इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, कॉम्प्युटर अशा तिन्ही शाखांमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांनी ‘सेरेब—ोस्पार्क इनोव्हेशन्स स्टार्टअप’ कंपनी तयार केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून गणेश थोरात, मिहीर केदार, ऋषीकेश सोनावणे, जान्हवी गुरव, श्याम रामचंदानी, नेहा तुरके हे विद्यार्थी ड्रोन तयार करण्याचे आणि त्याची दुरुस्ती करण्याचे काम करतात.
या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘सीएस मांबा’ या ड्रोनचा आपत्ती व्यवस्थापन कार्यासाठी वापर केला जातो. ड्रोन तयार करणारे विद्यार्थी म्हणाले, गणेश चतुर्थीच्या माध्यमातून हा संकल्प केला की, काहीतरी नावीन्यपूर्ण कार्य करावे. कॉलेज कॅम्पस ते सिग्नेट स्कूल अशी साधारण 700 ते 800 मीटर बाप्पांची ड्रोनवरून मिरवणूक काढण्यात आली.
पुण्यातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी काढली अनोखी मिरवणूक कॅम्पस ते शाळा : सातशे ते आठशे मीटरपर्यंत बाप्पा ड्रोनवर आरूढ
ड्रोनची रचना पाहिली, तर ड्रोनला वर पंखे असतात. परंतु, केवळ बाप्पांसाठी ड्रोनच्या खालच्या बाजूला पंखे केले आणि ड्रोनवर बाप्पा बसतील अशी जागा केली. बाप्पांच्या ड्रोनवरील मिरवणुकीचा हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाला.
– डॉ. राजेंद्र कानफाडे,
जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग