पुणे : १४ वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी वानवडी पोलिसांनी आणखी ६ जणांना अटक केली आहे. त्यातील पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूण १३ जणांनी तिच्यावर निर्जनस्थळी, जंगलात, लॉज आणि रेल्वे कार्यालय अशा ठिकाणी बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
मीराअली ऊर्फ मीरा अजीज शेख (वय २६, रा. मंगळवार पेठ), शाहुजर ऊर्फ सिराज साहेबलाल छप्परबंद (२८), समीर मेहबूब शेख (१९), फिरोज ऊर्फ शाहरुख साहेबलाल शेख (२२), मेहबूब ऊर्फ गौस सत्तार शेख (२३, सर्व रा. कोंढवा) यांच्यासह महंमद ऊर्फ गोलू मोज्जाम आलम (वय १९, रा. बिहार) यांना अटक करण्यात आली आहे. महंमद ऊर्फ गोलू हा या मुलीचा मित्र आहे. त्याने फूस लावून मुलीला बोलावले म्हणून त्यालाही अटक करण्यात आली आहे. याआधी सोमवारी पहाटे ८ जणांना अटक करण्यात आली होती.
मित्राला भेटण्यासाठी घरातून निघून आलेल्या या मुलीचे मदतीच्या बहाण्याने रिक्षाचालकाने अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. पहिल्या दिवशी चौघांनी तर दुसऱ्या दिवशी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे उघड झाले होते. मात्र आता एकूण १३ नावे स्पष्ट झाली आहेत. अटक केलेल्या ६ जणांना न्यायालयाने १० दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘तिने’ मित्रालाही सांगितला नव्हता हा प्रकार’
या मुलीवर सतत दोन दिवस अत्याचार झाल्यानंतरही तिने ही बाब मुंबई ते चंदीगड दरम्यानच्या रेल्वे प्रवासात सोबत असलेल्या मित्रालाही दिली नाही. या १३ नराधमांनी तिच्यावर पाशवी अत्याचार करताना अनैसर्गिक संभोगही केल्याचे निष्पन्न झाले आहे.
३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तिला पैसे देऊन मुंबईला पाठविले. २ सप्टेंबरला दादरला तिने मोबाईल बंद केला. पोलीस तातडीने मुंबईला गेले. परंतु, ती निघून गेली होती. तिने मित्राला दादरला बोलावून घेतले व ते दोघे रेल्वेने चंदीगडकडे गेले होते.